कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; १ जूनपासून मंदिरे, धार्मिक स्थळे सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 05:21 PM2020-05-27T17:21:33+5:302020-05-27T17:22:39+5:30
कोरोना रूग्णांच्या संख्येत कितीही केले तरी घट होत नाही. देशभरात लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मेपर्यंत लागू आहे.
कोरोना संसर्गामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवल्यामुळे अनेक देशांनी लॉकडाउनचे निर्बंध काही अटींसह शिथिल केले आहेत. कोरोनाच्या संसर्गासमोर जगातील अनेक देशांनी हात टेकले आहेत. भारतात सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. भारतातील कोणतेही राज्य अद्याप कोरोनामुक्त झाले आहे, अशी दिलासादायक बाब समोर आलेली नाही.
कोरोनावर मात करण्यासाठी भारतात लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मेपर्यंत लागू आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले लॉकडाऊन आता काही ठिकाणी हटवण्यात येणार आहेत. त्यासाठी काही नियम लागूही करण्यात आले आहेत. कर्नाटकमध्ये देखील १ जून पासून मंदिरे, धार्मिक स्थळे सुरू होणार आहे. असा निर्णय घेणारे कर्नाटक पहिले राज्य आहे. राज्याचे मंत्री के. श्रीनिवास पुजारी यांनी सांगितले की, मंदिरे उघडण्यासाठी दिशानिर्देश आणि एसओपी लवकरच जारी केले जातील. लोकांना याचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, कर्नाटक राज्यातील अनेक मजूर आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह चालवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भागात मजुरी करतात. लॉकडाऊन सुरू असताना शासनाच्या नियमानुसार मजुरांना त्यांच्या-त्यांच्या गावी जाण्यासाठी ई पास देण्याची सोय आहे. त्यानुसार, अनेक मजूर नियमांनुसार ई पास घेऊन प्रवास करत आहेत. पण ई पास असूनही कर्नाटक पोलीस या मजुरांना कर्नाटकात प्रवेश देत नसल्याचेही माहिती समोर आली होती.