कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली, महाराष्ट्रातील नेत्यांना कुत्र्यांची उपमा दिली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 07:33 PM2020-01-06T19:33:51+5:302020-01-06T19:34:28+5:30
बेळगाव येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर जोरदार टीका केली.
बेळगाव - कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राच्या एकीकरणावरून महाराष्ट्रातील नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांना प्रत्युत्तर देताना लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना कुत्र्यांची उपमा दिली आहे. कुत्रे भुंकतात म्हणून आपणही त्यांना चावायचे का? सीमाप्रश्न हा कधीच संपला असून, आता बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे, असे विधान सवदी यांनी यांनी केले.
बेळगाव येथे आयोजित एका कार्यक्रमाला लक्ष्मण सवदी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर जोरदार टीका केली. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विवेकबुद्धीने विधाने करावीत, असा सल्लाही दिला.
यादरम्यान, चंदगडच्या आमदारांनी केलेल्या विधानांबाबत विचारले असता सवदी यांनी कुत्रे भुंकतात म्हणून आपणही त्यांना चावायचे का? कुणी काही बोलले तरी त्याबाबत फारसा विचारक करण्याची गरज नाही, असे विधान केले. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी उधळलेल्या या मुक्ताफळांमुळे सीमाभागात मराठी आणि कानडी भाषिकांमधील वाद अधिकच उफाळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कानडी भाषकांची संघटना असलेल्या कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषकांविरोधात अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती, मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना सीमेवर उभे करून गोळ्या झाडल्या पाहिजेत, असे विधान त्यांनी केले होते.
मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन आता 60 वर्षे पूर्ण होत आली असली तरी कन्नड भाषिक कर्नाटकमध्ये समाविष्ट झालेले बेळगाव, निपाणी, कारवार हे मराठी भाषिक प्रदेश अद्याप महाराष्ट्रात सामील होऊ शकलेले नाही. त्यामुळे या सीमाभागात मराठी भाषिक आणि कानडी भाषिकांमध्ये वारंवार तणाव निर्माण होत असतो.