Karnataka Election 2023 : भाजप उमेदवाराविरुद्ध एफआयआर दाखल, कर्नाटक निवडणूक आयोगाची कारवाई; कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 05:23 PM2023-04-30T17:23:36+5:302023-04-30T17:27:51+5:30
ऑडिओ क्लिपची दखल घेत निवडणूक आयोगाने भाजप उमेदवाराविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून प्रचार जोरात सुरू आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये, भाजपचा एक उमेदवार आपला प्रतिस्पर्धी जेडीएस उमेदवाराला लाच देण्यासंदर्भात बोलत आहे. आता या ऑडिओ क्लिपची दखल घेत निवडणूक आयोगाने भाजप उमेदवाराविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, कर्नाटकातील चामराजनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार व्ही. सोमणा निवडणूक लढवत आहेत. व्ही. सोमणा यांनी आपल्याच मतदारसंघातील जनता दल सेक्युलरचे उमेदवार मल्लिकार्जुन स्वामी यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न केल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या बदल्यात व्ही. सोमणा यांनी जेडीएस उमेदवार मल्लिकार्जुन स्वामी यांना पैसे आणि सरकारी वाहन देऊ केले.
हा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भाजप उमेदवार व्ही. सोमणा यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान कोणताही चुकीचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने कर्नाटकच्या सीईओंना दक्षता वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतदारांना किंवा उमेदवारांना धमकावल्यास किंवा प्रलोभन दाखविल्यास निवडणूक आयोग कठोर कारवाई करेल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
#KarnatakaElection2023 | EC has taken serious note of the matter in which an audio clip is circulated on social media wherein an attempt has been made by V. Somana, BJP candidate from Chamarajanagar to influence Mallikarjuna Swamy, JD(S) candidate from the same constituency to… pic.twitter.com/IDpxnrGrM3
— ANI (@ANI) April 30, 2023
प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक
कर्नाटक निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 13 मे रोजी जाहीर होणार आहे. आता प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने सर्वच पक्षांनी प्रचारात पूर्ण ताकद लावली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही रविवारी प्रचारासाठी कर्नाटकात पोहोचले आहेत. योगी आदित्यनाथ आज कर्नाटकात चार सभा घेणार आहेत.