कर्नाटक निवडणुकीत पहिला प्रयोग होणार; घरबसल्या मतदान करता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 05:29 PM2023-03-29T17:29:29+5:302023-03-29T18:22:49+5:30
आज कर्नाटकातील विधानसभा निवडणूक जाहीर झाली. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन तारखा जाहीर केल्या.
आज कर्नाटकातील विधानसभा निवडणूक जाहीर झाली. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन तारखा जाहीर केल्या. कर्नाटकातील सर्व २२४ विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात १० मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर १३ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. तसेच यावेळी आणखी एक मोठी घोषणा निवडणूक आयोगाने केली. आता घरबसल्याही मतदान करता येणार आहे, याची सुरुवात कर्नाटकातून होणार आहे. नेमकी ही सुविधा कुणासाठी आणि याची प्रकिया काय असणार आहे, जाणून घेऊया.
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना १३ एप्रिल रोजी जारी केली जाईल, नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल आहे, त्यानंतर २४ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. निवडणूक आयोगाच्या या घोषणेमुळे कर्नाटकातही आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
घरबसल्या मतदान करता येणार
कर्नाटक निवडणुकीत निवडणूक आयोग वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी एक नवीन आणि विशेष सुविधा देणार आहे. 'विधानसभा निवडणुकीत घरबसल्या मतदानाची सुविधा ८० वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांसाठी असणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
२२४ मतदारसंघ असलेल्या कर्नाटक राज्यात ३६ जागा अनुसूचित जाती आणि १५ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. ५.२१ कोटी मतदार असून त्यापैकी २.५९ महिला मतदार आहेत. १६,९७६ मतदार १०० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत, तर ९.१७ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. याशिवाय ८० वर्षांवरील १२.१५ लाख मतदार आहेत, तर ५.५५ लाख दिव्यांग मतदार आहेत.
घरुन मतदान कसं करता येईल?
निवडणूक आयोगाची टीम फॉर्म-१२ डी घेऊन दिव्यांग आणि वृद्ध मतदारांकडे जाईल. याबाबत गुप्तता पाळण्यात येणार असून संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओग्राफी करण्यात येणार आहे.दिव्यांगांसाठी 'सक्षम' हे मोबाईल अॅप्लिकेशन सुरू करण्यात आले असून, त्यामध्ये ते लॉग इन करून मतदान करण्याची सुविधा निवडू शकतात, अशी माहिती आयोगाने दिली.