"मला मत द्या, मी तुम्हाला...",जमवली 10 हजारांची नाणी; पोतं घेऊन उमेदवार आला भरायला अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 02:08 PM2023-04-19T14:08:51+5:302023-04-19T14:10:22+5:30
एका अपक्ष उमेदवाराने एक रुपयाची नाणी लोकांकडून गोळा केली आहेत. 10,000 रुपयांची रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांना दिली.
कर्नाटकच्या यादगीर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या एका अपक्ष उमेदवाराने एक रुपयाची नाणी लोकांकडून गोळा केली आहेत. 10,000 रुपयांची रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांना दिली. ती मोजताना अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ आले. यंकप्पा यांनी मतदारसंघातील मतदारांकडून नाणी जमा केली होती. 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार यंकप्पा यांनी 1 रुपयाच्या नाण्यांमध्ये 10,000 रुपये जमा केले आहेत.
यादगीर येथील कार्यालयात टेबलावर पडलेली नाणी मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना दोन तास लागले. यादगीर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले अपक्ष उमेदवार यंकप्पा यांनी गळ्यात पोस्टर लटकवून तहसीलदार कार्यालय गाठले. पोस्टरमध्ये 12 व्या शतकातील समाजसुधारक बसवेश्वर, कर्नाटकचे संत-कवी कनकदास, स्वामी विवेकानंद, डॉ बी आर आंबेडकर आणि राज्यघटनेची प्रस्तावना यांचे फोटो होते.
कलबुर्गी जिल्ह्यातील गुलबर्गा विद्यापीठातून कला पदवीधर असलेल्या यंकप्पा यांच्याकडे केवळ 60 हजार रुपयांची संपत्ती आहे. तर वडिलांकडे एक एकर 16 गुंठे जमीन आहे. पोस्टरवर कन्नडमध्ये "हा फक्त एक रुपया नाही, मत आहे. तुम्ही मला मत द्या, मी तुम्हाला गरिबीतून मुक्त करीन" असा मेसेज होता. यंकप्पा यांनी संपूर्ण मतदारसंघात फिरून मतदारांकडून नाणी गोळा केल्याचे सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"