Karnataka Opinion Poll: कर्नाटकातील बहुमतापासून काँग्रेस दूर, भाजपालाही सत्तासुंदरीची हूल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 11:39 AM2018-04-24T11:39:04+5:302018-04-24T11:39:04+5:30
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथींनीही जोर धरला आहे. देशातल्या 20 राज्यांत सत्तेत असलेल्या एनडीएला कर्नाटकातही मोठं यश मिळण्याची चिन्हे आहेत.
बंगळुरु : कर्नाटकात विधानसभा 2018च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथींनीही जोर धरला आहे. देशातल्या 20 राज्यांत सत्तेत असलेल्या एनडीएला कर्नाटकातही मोठं यश मिळण्याची चिन्हे आहेत. कर्नाटकात सर्वच राजकीय पक्ष स्वतःच्या विजयाचे दावे करत आहेत. परंतु यावेळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडेच सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलंय.
भारतीय राजकारणाची दिशा ठरवणा-या या निवडणुकीचा कल जैन- लोकनीती- सीएसडीएस यांनी जाणून घेतला. जैन-लोकनीती-सीएसडीएसच्या सर्व्हेनुसार, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला 89 ते 95 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसलाही 85 ते 91 जागा मिळण्याची शक्यता आहे. देवेगौडांच्या जनता दल सेक्युलर या पक्षालाही 32 ते 38 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना 6 ते 12 जागा मिळू शकतात. लिंगायत समाजाला चुचकारण्यासाठी काँग्रेसनं गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना स्वतंत्र धर्माचा दर्जाही देऊ केला होता.
तरीही लिंगायत समाज हा भाजपासोबत असल्याचं या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसच्या सिद्धरामय्या यांना 30 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर भाजपाच्या येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदासाठी 25 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. देवेगौडांचे पुत्र एचडी कुमारस्वामी यांना 20 टक्के जनतेनं पसंती दिली. कर्नाटकातील एकूण 224 जागांपैकी बहुमतासाठी 113 जागांची गरज आहे. सर्व्हेनुसार काँग्रेसच्या हातून कर्नाटकाची सत्ता जाण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे जेडीएसशिवाय भाजपा सत्ता स्थापन करू शकत नसल्याचाही अंदाज वर्तवला जातोय.
- टाइम्स नाऊ आणि व्हीएमआर ओपिनियन पोल
- काँग्रेस- 91
- भाजपा- 89
- जेडीएस- 40
- इंडिया टुडे आणि कार्वे ओपिनियन पोल
- काँग्रेस- 90-91
- भाजपा- 76-86
- जेडीएस- 34-43
- सी-फोरचा ओपिनियन पोल
- काँग्रेस- 126
- भाजपा- 70
- जेडीएस- 27
- टीव्ही 9- सी व्होटर
- काँग्रेस- 102
- भाजपा- 96
- जेडीएस- 25