Karnataka Election Result: आता 'या' व्यक्तीच्या हातात आहे कर्नाटकची किल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 05:10 PM2018-05-15T17:10:43+5:302018-05-15T17:10:43+5:30
भाजपा बहुमताच्या जवळ जाता-जाता मध्येच अडल्याचं चित्र आहे. ही संधी साधत, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसनं हातमिळवणी केली आहे.
बेंगळुरूः कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-जेडीएस एकत्र आल्यानं बेंगळुरूपासून दिल्लीपर्यंत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशावेळी, कर्नाटकच्या सत्तेची किल्ली कुणाकडे द्यायची याचा निर्णय राज्यपाल वजुभाई वाला घेणार आहेत. त्यांनी अत्यंत सावध पवित्रा घेऊन जाणकारांना आपल्या भूमिकेबद्दल नेमके संकेत दिलेत.
वजुभाई वाला हे गुजरातमधील ज्येष्ठ भाजपा नेते आहेत. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले वजुभाई हे स्वाभाविकच मोदींच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. २००१ मध्ये त्यांनी आपला मतदारसंघ मोदींसाठी सोडला होता. त्यानंतर तब्बल नऊ वर्षं ते गुजरातमधील मोदी सरकारचे अर्थमंत्री होते. त्याआधीही त्यांनी हे खातं समर्थपणे सांभाळलं होतं. तब्बल १८ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, सप्टेंबर २०१४ मध्ये वजुभाईंची नियुक्ती कर्नाटकचे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. आता, खऱ्या अर्थानं तेच कर्नाटकमधील 'किंगमेकर' ठरताना दिसताहेत.
भाजपा बहुमताच्या जवळ जाता-जाता मध्येच अडल्याचं चित्र आहे. ते मॅजिक फिगरपासून सहा ते सात जागा दूर आहेत. ही संधी साधत, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसनं हातमिळवणी केली आहे. काँग्रेसनं कुमारस्वामींना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिलीय आणि ती त्यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे ते लवकरच सत्तास्थापनेचा दावा करतील. दुसरीकडे, भाजपाने आपले पत्ते अजून उघड केलेले नाहीत. परंतु, पूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतरच सत्तास्थापनेच्या दाव्यांचा विचार करण्याचं सूचक विधान राज्यपाल वजुभाई वाला यांनी केलं आहे. त्यामुळे मोदी-शहांच्या पातळीवरून, सत्तास्थापनेच्या काहीतरी हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पुढचे दोन दिवस वजुभाई वाला प्रकाशझोतात राहणार आहेत.