Karnataka Election Results 2018: मोदी-शहांनी मानले आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 04:39 AM2018-05-16T04:39:52+5:302018-05-16T04:39:52+5:30
काँग्रेसचा राज्यात पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दुपारी राज्यपाल वजुभाई वाला यांची राजभवनात भेट घेतली आणि त्यांना आपला राजीनामा सादर केला.
बंगळुरू/ नवी दिल्ली : काँग्रेसचा राज्यात पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दुपारी राज्यपाल वजुभाई वाला यांची राजभवनात भेट घेतली आणि त्यांना आपला राजीनामा सादर केला. तोपर्यंत काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद व अशोक गेहलोत यांनी जनता दलाचे नेते व माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्याशी चर्चा करून, पाठिंब्याचा प्रस्ताव दिला. त्या पक्षाने तो लगेचच मंजूर केला. त्यानंतर, सोनिया गांधी व राहुल गांधी यांनीही देवेगौडा यांच्याशी फोनवर चर्चा केली.
हे सुरू असताना भाजपाच्या दिल्लीतील मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकातील जनतेला आम्ही स्वच्छ सरकार देऊ आणि राज्याचा वेगाने विकास घडवू, असे आश्वासन दिले. काही राजकीय पक्ष संघराज्याची संकल्पना मोडीत काढायला निघाले असून, त्यांना कर्नाटकातील जनतेने धडा शिकविला आहे, अशी टीका त्यांनी काँग्रेसचे नाव न घेता केली. भाजपा हा हिंदी राज्यातील पक्ष आहे, अशी टीका आमच्यावर केली जाते, पण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, त्रिपुरा तसेच ईशान्येकडील राज्ये काय हिंदीतून बोलतात की काय, असा सवाल करून पंतप्रधान म्हणाले की, आजच्या घडीला केवळ भाजपा हाच राष्ट्रव्यापी पक्ष असून, इतर पक्ष एखाद्या वा दोन-तीन राज्यांपुरते सीमित राहिले आहेत. अमित शहा म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेसचा सर्वात मोठा पराभव झाला असून, राहुल गांधी यांचे नेतृत्व लोकांना मान्य झालेले नाही. त्यामुळे २0१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला आणखी मोठे यश मिळेल आणि आम्ही २0२२ पर्यंत नवा भारत उभा करू. शहा यांनी काँग्रेसने राज्यात जाती-पातींचे राजकारण केले आणि दलितांना भडकावण्याचे काम केले, असा आरोपही त्यांनी केला. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला यशाचा रथ यापुढेही असाच सुरू राहील. मोदी यांनी अमूल्य
वेळ दिला आणि त्याचा फायदा पक्षाला मिळाला आहे, असे शहा म्हणाले. (वृत्तसंस्था)
>विजयोत्सव थंडावला? : भाजपाला संपूर्ण बहुमत मिळेल, असे त्या पक्षाच्या सर्वच नेत्यांना वाटत होते. त्यामुळे बंगळुरू व दिल्लीत मोठा जल्लोष करण्याचे भाजपाने ठरविले होते, पण जसजसे निकाल येत गेले आणि स्पष्ट बहुमत मिळत नसल्याचे स्पष्ट झाले, तसतसे आनंद कमी होत गेला. त्यामुळे दिल्लीतील पक्ष मुख्यालयात विजयोत्सव फार मोठ्या प्रमाणात न करण्याचा निर्णय भाजपाने घेतला.