Karnataka Election Results: काँग्रेसनं याआधीही 'असाच' केला होता भाजपाचा 'गेम', पण... 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 12:24 PM2018-05-16T12:24:21+5:302018-05-16T12:24:21+5:30

कर्नाटकचे निकाल जाहीर झाल्यानंतर, भाजपाचंच 'शाही तंत्र' वापरून काँग्रेसनं त्यांची कोंडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, पण....

Karnataka Election Results: congress had played same card in delhi to keep bjp out | Karnataka Election Results: काँग्रेसनं याआधीही 'असाच' केला होता भाजपाचा 'गेम', पण... 

Karnataka Election Results: काँग्रेसनं याआधीही 'असाच' केला होता भाजपाचा 'गेम', पण... 

googlenewsNext

नवी दिल्लीः कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, पण काँग्रेस-जेडीएसनं हातमिळवणी करत त्यांची खुर्ची खेचण्याची खेळी केलीय. पण, काँग्रेसनं भाजपाला असाच धक्का २०१३ मध्येही दिला होता. त्यामुळे त्या निवडणुकीत 'टॉप' येऊनही सत्तास्थापनेवेळी ते 'फ्लॉप' ठरले होते. 

कर्नाटकचे निकाल जाहीर झाल्यानंतर, भाजपाचंच 'शाही तंत्र' वापरून काँग्रेसनं त्यांची कोंडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गोवा, मेघालय, मणिपूरमध्ये भाजपानं जे राजकारण केलं, त्याचा 'बदला' काँग्रेस कर्नाटकात घेतोय, असंही बोललं जातंय. पण, हे जोडाजोडीचं आणि फोडोफोडीचं राजकारण अजिबातच नवं नाही. ते भाजपानं शोधलंय असं तर अजिबातच नाही. उलट, भाजपानं गोवा, मेघालय, मणिपूरमध्ये जे केलं, तेच काँग्रेसनं २०१३च्या दिल्ली विधानसभेच्या निवडणूक निकालांनंतर केलं होतं.   

दिल्लीतील ७० जागांपैकी ३२ जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. आम आदमी पार्टीनं २८ जागा जिंकल्या होत्या. भाजपाने काही हालचाली करायच्या आधीच, आठ जागा जिंकलेल्या काँग्रेसनं 'आप'ला बाहेरून पाठिंबा जाहीर करून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं होतं. अर्थात, हे सरकार फक्त ४९ दिवस टिकू शकलं होतं. त्यानंतर, दिल्लीत पुन्हा निवडणूक झाली होती आणि त्यात 'आप'नं मुसंडी मारली होती. 

कर्नाटकमधील मतमोजणीत १०४ जागांपर्यंत पोहोचलेल्या भाजपाला बहुमतासाठी आठ आमदारांची गरज आहे. याउलट, काँग्रेस (७८) आणि जेडीएसचं (३७) एकत्रित संख्याबळ ११५ होतंय. दोघांनीही राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यानंतर, राजकीय घडामोडींना वेग आलाय. आत्ताच्या घडीला काँग्रेस-जेडीएसचं पारडं जड असलं, तरी काहीही घडू शकतं. 

दरम्यान, निवडणूक निकालात अव्वल ठरलेला पक्ष सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्याची अलीकडच्या काळातील काही उदाहरणं....    

मेघालय (२०१८)
एकूण जागा - ६०
काँग्रेस २१ जागा जिंकून ठरला सर्वात मोठा पक्ष. पण, १९ जागा जिंकणाऱ्या एनपीपीने भाजपा (२), यूडीपी (६) आणि तीन अन्य आमदारांना सोबत घेऊन स्थापन केलं सरकार.

मणिपूर (२०१७)
एकूण जागा - ६०
काँग्रेसनं सर्वाधिक २८ जागा जिंकल्या. 'मॅजिक फिगर'पासून ते फक्त तीन जागा दूर होते. पण, २१ जागा जिंकणाऱ्या भाजपानं त्यांना धक्का दिला. एनपीपी, एनपीएफ आणि एलजेपी यांच्याशी हातमिळवणी करत त्यांनी सरकार स्थापन केलं. 

गोवा (२०१७)
एकूण जागा  - ४० 
काँग्रेसने १७ जागा जिंकल्या होत्या. भाजपाला १३ जागांपर्यंतच मजल मारता आली होती. पण अमित शहांनी एका रात्रीत सगळं गणितच बदलून टाकलं. मगोप, अन्य आणि तीन अपक्षांच्या पाठिंब्यावर भाजपाने गोव्यातील सत्ता कायम राखली होती. 
 

Web Title: Karnataka Election Results: congress had played same card in delhi to keep bjp out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.