कर्नाटक : आठवडाभरात झाला मंत्रिमंडळाचा विस्तार, एचके पाटलांसह २४ जणांना स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 07:02 AM2023-05-28T07:02:14+5:302023-05-28T07:02:38+5:30
पक्षाने सत्तेवर आल्यानंतर एका आठवड्यात सर्व ३४ मंत्रिपदे भरली आहेत.
बंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने शनिवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करून २४ मंत्र्यांचा समावेश केला. यात फक्त एक महिला लक्ष्मी हेब्बाळकर आणि ज्येष्ठ आमदार एच.के. पाटील यांचा समावेश आहे. अशा प्रकारे पक्षाने सत्तेवर आल्यानंतर एका आठवड्यात सर्व ३४ मंत्रिपदे भरली आहेत.
राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी २४ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यापैकी नऊ सदस्य बी. नागेंद्र, मधू बंगारप्पा, लक्ष्मी हेब्बाळकर, मंकल वैद्य, डॉ. एम.सी. सुधाकर, के.एन. राजन्ना, एन.एस. बोसराजू, सुरेश बी.एस. आणि के. व्यंकटेश हे पहिल्यांदा मंत्री झाले आहेत. बोसराजू हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव आहेत. रूपकला शशिधर, कनीज फातिमा व लक्ष्मी हेब्बाळकर या तीन महिला निवडून आल्या असल्या तरी मंत्रिमंडळात केवळ हेब्बाळकरांनाच स्थान दिले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासह दहा मंत्र्यांनी २० मे रोजी शपथ घेतली होती.
यांचा समावेश
एच.के. पाटील, कृष्णा बायरेगौडा, एन. चेलुवरायस्वामी, के. व्यंकटेश, एच.सी. महादेवप्पा, प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष ईश्वर खंडरे आणि माजी प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनीही शपथ घेतली.
याशिवाय के.एन. राजण्णा, शरणबसप्पा दर्शनपूर, शिवानंद पाटील, रामाप्पा बाळाप्पा तिम्मापूर, एस.एस. मल्लिकार्जुन, शिवराज संगप्पा तंगदागी, शरणप्रकाश रुद्रप्पा पाटील, मंकल वैद्य, लक्ष्मी हेब्बाळकर, रहीम खान, डी. सुधाकर, संतोष लाड, एन.एस. बोसराजू, सुरेश बी.एस., मधू बंगारप्पा, एम.सी. सुधाकर आणि बी. नागेंद्र यांनी शपथ घेतली.