Karnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 06:24 PM2018-04-20T18:24:02+5:302018-04-20T18:24:02+5:30
देशातील २० राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाला आता कर्नाटक जिंकण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा कामाला लागलेत. पण, २०१३च्या निवडणुकीत ज्या दोन नेत्यांमुळे भाजपाला फटका बसला होता, त्यांच्यावरच यावेळी भाजपाची भिस्त असेल, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. ही जोडगोळी म्हणजे...
बेंगळुरू - देशातील २० राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाला आता कर्नाटक जिंकण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा कामाला लागलेत. पण, २०१३च्या निवडणुकीत ज्या दोन नेत्यांमुळे भाजपाला फटका बसला होता, त्यांच्यावरच यावेळी भाजपाची भिस्त असेल, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. ही जोडगोळी म्हणजे, माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा आणि माजी मंत्री बी. श्रीरामुलू.
पाच वर्षांपूर्वी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला २२४ पैकी फक्त ४० जागा जिंकता आल्या होत्या, तर काँग्रेसनं १२२ जागांवर बाजी मारत बहुमत मिळवलं होतं. येडियुरप्पा आणि श्रीरामुलू स्वतंत्रपणे लढल्यानं झालेल्या मतविभाजनाचा फटका भाजपाला बसल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतं. २०१२ मध्ये भाजपाला राम-राम ठोकलेल्या येडियुरप्पांनी कर्नाटक जनता पक्ष स्थापन करून ही निवडणूक लढवली होती. त्यांनी सहा जागांवर विजय मिळवला होता आणि ३५ मतदारसंघांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर होते. त्याचवेळी, श्रीरामुलू यांच्या बीएसआर काँग्रेसनं चार जागा जिंकल्या होत्या.
येडियुरप्पा भाजपासोबत असते तर कर्नाटक जनता पक्षाला मिळालेल्या सहा जागा आणि मतं त्यांच्या पारड्यात पडली असती. त्यामुळे त्यांची बेरीज ७४ पर्यंत गेली असती. बीएसआरच्या जागा आणि मतांच्या जोरावर त्यांनी ८०चा आकडा सहज पार केला असता, याकडे राजकीय जाणकार लक्ष वेधतात.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत येडियुरप्पा आणि श्रीरामुलू हे दोघंही भाजपासोबत होते. मोदी लाट आणि या दोघांचं पक्षातील पुनरागमन या जोरावर, कर्नाटकातील तब्बल १३३ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचं 'कमळ' फुललं होतं. आज मोदी लाट ओसरली असली, तरी येडियुरप्पा आणि श्रीरामुलू पक्षासोबत असणं ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते, असं विश्लेषकांनी नमूद केलं.
अर्थात, कर्नाटकची लढाई अत्यंत अटीतटीचीच असेल. कारण, 'मिशन २०१९'च्या आधी काँग्रेसकडून आणखी एक राज्य काढून घेऊन भाजपाला आपलं वर्चस्व सिद्ध करायचंय, तर काँग्रेसला हे राज्य राखून आपलं अस्तित्व टिकवायचंय - कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास जागवायचाय. म्हणूनच, कर्नाटकचं सत्तासमीकरण ठरवणाऱ्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचं आश्वासन काँग्रेसनं दिलंय. दुसरीकडे, ते कसं खोटं आहे, आधी त्यांनी या प्रस्तावाला कसा विरोध केला होता, हे भाजपा नेते सांगत आहेत. सिद्धरामय्या यांच्या कारभारावर ते टीकास्त्र सोडताहेत, पण त्यात त्यांनी उशीर केल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
कर्नाटकात १२ मे रोजी मतदान होतंय. म्हणजेच, अजून २०-२२ दिवस शिल्लक आहेत. त्यात बरंच काही घडेल, प्रचाराचा धुरळा उडेल. त्यावर बरीच गणितं अवलंबून असली, तरी येडियुरप्पा आणि श्रीरामुलू यांच्याकडे भाजपाची मंडळी ट्रम्प कार्ड म्हणूनच बघताहेत.