Karnataka Elections 2023: मतदान केंद्रावर सजावट, मतदारांसाठी खास व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 12:45 PM2023-05-10T12:45:49+5:302023-05-10T12:46:31+5:30
विशेष थीमनुसार स्थापन करण्यात आलेली मतदार केंद्रे लक्षवेधी
प्रकाश बेळगोजी
बेळगाव : देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज, बुधवारी सकाळपासून सुरुवात झाली आहे. सकाळच्या सुमारास मतदान केंद्रावर तुरळक गर्दी पाहायला मिळाली. मात्र, नऊ नंतर बेळगाव जिल्ह्यातील मतदानात झपाट्याने वाढ होवून 11 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यात 22.42 टक्के मतदानाची नोंद झाली.
मतदानासाठी मतदारांमध्ये निवडणूक आयोगाने जनजागृती केली आहे. मतदानासाठी जागृती करण्यासाठी सायकल फेरी, पथनाट्य, प्रचारफेरी, व्हिडिओ यासारखे उपक्रम प्रशासनाने राबविले असून या निवडणुकीत विशेष थीम असणारी मतदान केंद्रेही स्थापन करण्यात आली आहेत.
विशेष थीमनुसार स्थापन करण्यात आलेली मतदार केंद्रे लक्षवेधी ठरत असून प्रत्येक मतदारसंघात महिला मतदारांसाठी सखी किंवा पिंक बूथ सुरू करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांमध्ये मतदानप्रक्रियेचे चित्रिकरण, वेब कास्टिंग देखील करण्यात येत असून काही त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता निवडणूक आयोगाने घेतली आहे.
मतदारांसाठी खास व्यवस्था
मतदारांसाठी विश्रांती खोली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, अंध मतदारांसाठी ब्रेल मतपत्रिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. अलीकडेच नोंदणी केलेल्या ८० वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांसाठी बॅलेट पेपरद्वारे घरबसल्या मतदान घेण्यात आले आहे.
काँग्रेस विरुद्ध भाजप लढत
जिल्ह्यातील 18 पैकी काही मतदार संघात थेट काँग्रेस विरुद्ध भाजप लढत आहे, तर काही मतदारसंघांमध्ये प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष यांच्यात कडवी झुंज होईल असा अंदाज आहे. दुसरीकडे बेळगाव आणि खानापूर तालुक्यात राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांसमोर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनी तगडे आव्हान उभे केले आहे.