Karnataka Elections 2023: 'तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती', सोनिया गांधींनी RSS कार्यकर्त्याचा प्रचार केल्यामुळे ओवेसींची जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 02:23 PM2023-05-07T14:23:51+5:302023-05-07T14:24:58+5:30
Karnataka Elections 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सोनिया गांधी मैदानात उतरल्या आहेत.
Asaduddin Owaisi On Sonia Gandhi: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. कर्नाटकात भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या जगदीश शेट्टर यांचा प्रचार केल्यामुळे गांधी यांच्यावर टीका होत आहे. काँग्रेसच्या विचारधारेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ओवेसी म्हणाले की, सोनिया गांधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) उमेदवाराचा प्रचार करतील अशी अपेक्षा नव्हती.
एआयएमआयएम खासदार ओवेसी यांनी पुढे म्हटले की, हीच तुमची धर्मनिरपेक्षता आहे का? अशा प्रकारे मोदींशी लढणार का? मॅडम सोनिया गांधी जी, तुम्ही आरएसएसच्या लोकांच्या प्रचारासाठी याल अशी मला अपेक्षा नव्हती. जगदीश शेट्टर हे आरएसएसचे आहेत. वैचारिक लढाईत काँग्रेस अपयशी ठरली असून त्यांचे विदूषक, नोकर, गुलाम माझ्यावर आरोप करतात ही शरमेची बाब आहे, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसचे शेट्टारबाबत मत
काँग्रेसने हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून जगदीश शेट्टर यांना उमेदवारी दिली आहे. तिथूनच ते गेल्या विधानसभेत भाजपच्या तिकिटावर विजयी झाले होते. काँग्रेसने शेट्टर यांच्या पक्षात सामील झाल्याचा बचाव केला आणि दावा केला की कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आरएसएसशी संलग्न असूनही ते "धर्मनिरपेक्ष व्यक्ती" आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
शनिवारी (6 मे) सोनिया गांधी यांनी तीन वर्षांनंतर पहिली सभा घेतली. राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि जगदीश शेट्टर यांच्यासोबत त्या एकाच मंचावर दिसल्या. यावेळी त्यांनी 'द्वेष' पसरवल्याबद्दल भाजपवर हल्लाबोल केला. याच सभेवरुन काँग्रेस आरएसएसशी संबंधित उमेदवाराचा प्रचार करत असल्याचा आरोप एमआयएमने केला आहे.