Karnataka Elections 2023: बेळगावात मतमोजणीची तयारी पूर्ण, कोण बाजी मारणार?; उद्या स्पष्ट होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 03:56 PM2023-05-12T15:56:28+5:302023-05-12T15:57:04+5:30
पोस्टल बॅलेट्सची मोजणी सर्वात आधी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात चुरशीने झालेल्या मतदानाची मोजणी शनिवारी (दि. १३) होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत आहेत. शनिवारी दुपारपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
बेळगाव जिल्ह्यात एकूण ७६.७०% मतदान झाले असून सर्व ईव्हीएम आरपीडी कॉलेजमधील स्ट्राँगरूममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. शनिवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.
मुख्य जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितेश पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व १८ मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. त्यानंतर सर्व १८ निवडणूक अधिकाऱ्यांनी मतपेट्या राणी पार्वतीदेवी कॉलेजमध्ये स्थापन केलेल्या स्ट्राँगरूममध्ये आणल्या आहेत. पहाटेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. सर्व उमेदवार आणि त्यांचे राजकीय पक्षांचे एजंट यांच्या उपस्थितीत आज छाननी प्रक्रिया पार पडेल.
शनिवारी आरपीडी महाविद्यालयातील स्ट्राँगरूममधून मतपेट्या बाहेर काढून सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ करण्यात येईल. सर्व्हिस व्होटर्सची संख्या २६ हजारांहून अधिक आहे. त्यांच्या मोजणीसाठी १ टेबलची व्यवस्था केली आहे. पोस्टल बॅलेट्सची मोजणी सर्वात आधी करण्यात येईल. त्यासाठी २ टेबल्स निश्चित केले आहेत.
शनिवारी मतमोजणी दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत येणारी पोस्टल मते मोजणीसाठी स्वीकारण्यात येतील. सर्व १८ मतदारसंघांसाठी प्रत्येकी २ टेबल्स अशी एकूण ३६ टेबल्स मांडून मतमोजणी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.