Karnataka Elections: कर्नाटक निवडणुकीत ओवेसींच्या AIMIM मेगा प्लॅन; १०० जागांवर उभे करणार उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 02:36 PM2022-11-10T14:36:20+5:302022-11-10T14:37:58+5:30
कर्नाटकातील काही खास मतदारसंघांची AIMIM ने निवड केली आहे.
Karnataka Elections, Asaduddin Owaisi: असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) पुढील वर्षी होणाऱ्या कर्नाटक निवडणुका लढवण्यासाठी सज्ज होत आहे. कर्नाटकात पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत AIMIM हा पक्ष विधानसभेच्या एकूण २२४ जागांपैकी १०० जागा लढवणार आहे. या निवडणुकीसाठी एमआयएमचा खास प्लॅन तयार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'एमआयएम'चे प्रदेशाध्यक्ष उस्मान घनी म्हणाले की, अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव असलेल्या ५२ विधानसभा जागांवर आमचा पक्ष विशेष लक्ष केंद्रित करणार आहे.
उस्मान घनी यांनी म्हटले आहे की, ज्या ठिकाणी अनुसूचित जाती-जमातींचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतील, त्या जागांवर AIMIM अधिक उमेदवार उभे राहतील. उत्तर कर्नाटकात पक्षाला जनतेचा मोठा पाठिंबा असल्याचे ते वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले. त्यामुळे अशा स्थितीत तेथे अधिकाधिक जागांवर निवडणूक लढवली गेली पाहिजे. एआयएमआयएम कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष उस्मान घनी यांनी सांगितले की, विजयपुरा, कलबुर्गी, रायचूर, बसवकल्याण, हुब्बल्ली, बेळगाव आणि कुशतगी अशा काही जागा आहेत जिथे एमआयएम पुढील विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार आहे.
कर्नाटकातील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यात संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली जात आहे. त्याला लवकरच आकार दिला जाईल. यापूर्वी २०१८ मध्ये देखील AIMIM ने कर्नाटकमध्ये निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी जेडीएससोबत युती केली. तेव्हा पक्षाला फारसा फायदा झाला नाही. घनी म्हणाले की २०१८ मध्ये एमआयएमच्या सदस्यांनी जेडीएसच्या निवडणूक प्रचारात भाग घेतला होता. मात्र २०२३ मध्येही दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार की नाही याबाबत अद्याप दोन्ही पक्षांमध्ये निर्णय झालेला नाही.