Karnataka Elections : 90 व्या वर्षी एचडी देवेगौडांनी हाती घेतली प्रचाराची धुरा; पक्षाला फायदा होणार..?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 07:30 PM2023-04-25T19:30:06+5:302023-04-25T19:30:28+5:30
माजी पंतप्रधान आणि जनता दल (सेक्युलर) नेते एचडी देवेगौडा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सक्रिय दिसत आहेत.
Karnataka Election: माजी पंतप्रधान आणि जनता दल (सेक्युलर) नेते एचडी देवेगौडा 90 व्या वर्षीही कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सक्रिय दिसत आहेत. त्यांनी सोमवारी (24 एप्रिल) कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातून आपल्या प्रचाराला सुरुवात केली. तुमकूर या जिल्ह्यातून 1994 मध्ये JD(S) ने 11 पैकी 9 जागा जिंकल्या होत्या. पक्ष पुन्हा एकदा याठिकाणी आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे.
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांना चालण्यास त्रास होतो, तरीदेखील ते उत्साहाने या निवडणुकीत सहभाग नोंदवत आहेत. चालताना त्यांना त्यांच्या सुरक्षा कर्मचार्यांनी मदत घ्यावी लागते, पण जेव्हा ते बोलतात, तेव्हा त्यांचे शब्द ऐकणाऱ्याला विचार करायला भाग पाडतात. देवेगौडा त्यांचा मुलगा आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यासोबत प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.
जनता दल (सेक्युलर) पट्टनायकनहल्ली मठावर लक्ष ठेवून आहे. मठाचे अध्यक्ष द्रष्टा नांजावधूत स्वामी आणि वोक्कलिगा समुदायाचे सदस्य आहेत. त्यांचा 11 मतदारसंघांवर मोठा प्रभाव आहे. या जागांवर वोक्कालिगा समुदायाची लोकसंख्या 40% च्या दरम्यान आहे. देवेगौडा हे राज्यातील सर्वात दिग्गज वोक्कालिगा नेते आहेत. त्यामुळे जनता दल (सेक्युलर) या जागांवर विशेष लक्ष ठेवून आहे.
आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करताना एचडी देवेगौडा म्हणाले, “मी वयाच्या 90 व्या वर्षी हे काम हाती घेतले आहे. 10 मे रोजी निवडणुका आहेत. मी 8 मेच्या संध्याकाळपर्यंत काम करेन. यावेळी माजी पंतप्रधानांनी भाजप सरकारच्या अनेक अपयशी आणि नवीन घोषणांवर निशाणा साधला. आता त्यांचा किती प्रभाव पडतो, हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्पष्ट दिसेल.