नरेंद्र मोदी स्मार्ट पंतप्रधान; देवेगौडा यांची स्तुतीसुमनं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 12:53 PM2018-05-03T12:53:56+5:302018-05-03T12:53:56+5:30
भाजपा आणि जेडीएस आघाडीच्या चर्चेला उधाण
बंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान आणि जेडीएस प्रमुख एच. डी. देवेगौडा यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. मोदींनी केलेल्या या स्तुतीसुमनांच्या वर्षावानंतर आता देवेगौडा यांनीही मोदींचं कौतुक केलंय. मोदींमुळे खासदार संसदेत चांगलं काम करताहेत. मोदी हे स्मार्ट पंतप्रधान असून देशातील महत्त्वाचे मुद्दे त्यांना नीट माहिती आहेत, असंही देवेगौडा यांनी म्हटलं. देवगौडा यांनी केलेल्या या कौतुकामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मोदी आणि देवेगौडा यांनी एकमेकांची स्तुती केल्यामुळे भाजपा आणि जेडीएसमध्ये आघाडी होणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र अशी कोणतीही आघाडी होणार नसल्याचं देवेगौडा यांनी स्पष्ट केलंय. मोदींची स्तुती हा शिष्टाचाराचा भाग असून त्याचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असं देवेगौडांनी म्हटलंय. '2014 मध्ये भाजपाला बहुमत मिळाल्यास लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देईन, असं मी म्हटलं होतं. मी तसा निर्णयही घेतला होता. मात्र मोदींनी याबद्दल मला फेरविचार करण्यास सांगितलं. त्यांनी मला निर्णय बदलण्याचा आग्रह केला. लोकसभेत देशाला वरिष्ठ नेत्यांची आवश्यकता आहे, असं मोदींनी त्यावेळी मला सांगितलं होतं,' असंही देवगौडा म्हणाले.
यावेळी देवेगौडा यांनी राहुल गांधींवरही भाष्य केलं. 'राहुल गांधी माझ्याबद्दल जे काही म्हणाले, ते मोदींना ऐकलं असेल. त्यामुळे शिष्टाचाराचा भाग म्हणून त्यांनी माझं कौतुक केलं. याचा अर्थ आमच्यातील राजकीय मतभेद संपले, असा होत नाही,' असंही देवेगौडा यांनी म्हटलं. कर्नाटकमध्ये 12 मे रोजी मतदान होईल आणि 15 मे रोजी मतमोजणी होईल.