कर्नाटकचे वनमंत्री उमेश कत्ती यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन; हुक्केरीतून आठ वेळा गेले होते विधानसभेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 09:53 AM2022-09-07T09:53:36+5:302022-09-07T09:54:20+5:30
बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी मतदारसंघातून उमेश कत्ती हे आठवेळा कर्नाटक विधानसभेवर निवडून गेले होते. बोम्मई सरकारमध्ये ४ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांनी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार तसेच वनमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
बंगळुरू: कर्नाटकचे अन्न व नागरी पुरवठा तसेच वनमंत्री, हुक्केरीचे आमदार उमेश कत्ती (वय ६१) यांचे मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, बंधु माजी खासदार रमेश कत्ती, चार नातवंडे असा परिवार आहे.
बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी मतदारसंघातून उमेश कत्ती हे आठवेळा कर्नाटक विधानसभेवर निवडून गेले होते. बोम्मई सरकारमध्ये ४ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांनी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार तसेच वनमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
बंगळुरू येथील डॉलर्स कॉलनी मधील त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कत्ती यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना तातडीने एम. एस. रामय्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांचे निधन झाले. १४ मार्च १९६१ रोजी खडकलाट येथे जन्मलेल्या उमेश कत्ती यांनी यापूर्वी सार्वजनिक बांधकाम आणि कृषिमंत्री म्हणूनही काम पाहिले होते.
मूळचे बेल्लद बागेवाडी येथील असलेल्या उमेश कत्ती यांचे वडिल विश्वनाथ कत्ती हेहीं कर्नाटकचे आमदार होते. १९८५ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर उमेश कत्ती राजकारणात उतरले. हुक्केरी विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी आठवेळा प्रतिनिधित्व केले. स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याच्या मागणीसाठी ते आग्रही होते.
त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शोक व्यक्त केला आहे. कत्ती यांच्या निधनाने कर्नाटकने एक कुशल राजकारणी, सक्रिय नेता आणि निष्ठावान जनसेवक गमावला आहे, असे बोम्मई यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
पार्थिव आज बेळगावात आणणार
मंत्री उमेश कत्ती यांचे निधन झाल्याचे वृत्त समजताच बेळगावसह हुक्केरी मतदारसंघावर शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव आज, बुधवारी सकाळी खास विमानाने बेळगाव येथे आणले जाणार आहे.