कौतुकास्पद! 'या' फळविक्रेत्याला जाहीर झाला पद्मश्री पुरस्कार, बातमी मिळताच व्यक्त केली अशी प्रतिक्रिया...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 01:33 PM2020-01-27T13:33:06+5:302020-01-27T13:48:12+5:30
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारच्यावतीने पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारच्यावतीने पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदा 7 दिग्गजांना पद्मविभूषण, 16 मान्यवरांना पद्मविभूषण आणि 118 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. उल्लेखनीय आणि विधायक कार्याची दखल घेत सरकारने या पुरस्कारांची घोषणा केली. भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कारांच्या यादीत कर्नाटकातील हरेकाला हजाब्बा यांच्याही नावाचा समावेश आहे. हरेकाला हे एक फळविक्रेते असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
कर्नाटकमध्ये राहणाऱ्या 68 वर्षीय हरेकाला हजाब्बा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. हरेकाला यांचं फळाचं एक छोटं दुकान आहे. मात्र या सर्वसामान्य व्यक्तीने लहान मुलांसाठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा उभारली आहे. एवढेच नाही तर सध्या ते विश्वविद्यालय उभारण्याच्या तयारीत आहे. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीचा गौरव करण्यात येणार आहे. आपल्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला यावर विश्वासच बसत नसल्याची प्रतिक्रिया हरेकाला यांनी दिली आहे. तसेच पद्मश्री पुरस्कार मिळेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. खूप आनंद झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
38 वर्षांपासून भागवताहेत भुकेल्यांची भूक, लंगर बाबांचा पद्मश्रीनं सन्मान https://t.co/Mbb9XtkSMI
— Lokmat (@MiLOKMAT) January 26, 2020
हरेकाला हजाब्बा हे निरक्षर आहेत. ते कधीही शाळेत गेले नाहीत. एकदा एक परदेशी दाम्पत्य हरेकाला यांच्याकडे संत्री विकत घेण्यासाठी आले होते. त्यावेळी दाम्पत्याने त्यांना संत्र्याची किंमत विचारली. मात्र हरेकाला यांना फक्त स्थानिक भाषा येत असल्याने त्यांना परदेशी दाम्पत्याची भाषा समजली नाही. त्यामुळे ते दाम्पत्य संत्री न घेताच निघून गेलं. या घटनेचं हरेकाला यांना फार वाईट वाटलं. आपल्या गावात प्राथमिक शाळा असणं गरजेचं असल्याची जाणीव त्यांना झाली. तसेच येणाऱ्या पिढीला अशा गोष्टीचा सामना करावा लागू नये यासाठी शाळा उभारण्याची गरज वाटली.
25 हजार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या मोहम्मद चाचांना पद्मश्री https://t.co/Jfs3e3ZdII
— Lokmat (@MiLOKMAT) January 26, 2020
हरेकाला यांना शिक्षणाचं महत्त्व कळलं आणि त्यांनी गावकऱ्यांना समजावलं. तसेच गावकऱ्यांच्या मदतीने गावात एक शाळा सुरू केली. हरेकाला या शाळेची स्वच्छता करतात. तसेच शाळेत येणाऱ्या मुलांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करतात. गावापासून 25 किलोमीटर दूर असलेल्या जिल्हा पंचायत कार्यालयात जाऊन ते अधिकाऱ्यांची भेट घेतात तसेच शैक्षणिक सुविधांचीही माहिती घेतात. 2008 मध्ये नयापुडू गावामध्ये त्यांनी माध्यमिक शाळा उभारली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
राहीबाई पोपेरे, पोपटराव, वाडकर आणि सय्यदभाई यांना पद्मश्री! https://t.co/FwtmiFDM1D
— Lokmat (@MiLOKMAT) January 26, 2020
68 वर्षीय हरेकाला हजाब्बा हे मुलांच्या शिक्षणासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. रोज सकाळी ते लवकर उठून शाळेची साफसफाई करतात. तसेच मुलांना शुद्ध पाणी प्यायला मिळावं या उद्देशाने पाणी उकळतात. मुलांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी ते तत्पर असतात. त्याच्या या कामाची दखल केंद्र सरकारने घेतली असून त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. 'गृह मंत्रालयाकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याचा फोन आला. पुरस्कार जाहीर झाला यावर विश्वासच बसत नाही. पद्मश्री पुरस्कार मिळेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. खूप आनंद झाला आहे' अशी प्रतिक्रिया हरेकाला हजाब्बा यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान बाळासाहेबांचा; राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना सूचना
''खोलीत दोन हाणा, पण बाहेर साहेब म्हणा ही शिवसेनेची जुनी सवय''
Today's Fuel Price : सर्वसामान्यांना दिलासा! सलग पंधरा दिवस इंधन दरात घट; जाणून घ्या नवे दर
Corona Virus: चीननं घेतला कोरोना व्हायरसचा धसका; हस्तांदोलन करण्यावरही घातली बंदी
सरपंच थेट जनतेतूनच हवा; ठाकरे सरकारच्या 'या' निर्णयाला लागणार ब्रेक?
CAA : सीएएला विरोध केला म्हणून अमित शहांसमोरच तरुणाला मारहाण