कर्नाटकात महाराष्ट्रापेक्षा स्वस्त पेट्रोल-डिझेल; सीमाभागातील पंप चालकांची विक्री ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 12:57 PM2022-05-04T12:57:20+5:302022-05-04T12:58:30+5:30
इंधन विक्री ४ लाखांवरून ३० हजार लिटरपर्यंत आली खाली.
गुणवंत जाधवर
उमरगा (जि. उस्मानाबाद) : कर्नाटक राज्यात महाराष्ट्रापेक्षा इंधन स्वस्त आहे. प्रतिलिटर आठ ते नऊ रुपयांची दरात तफावत आहे. उमरग्यासह परिसरातील वाहनधारक इंधनासाठी कर्नाटकचा रस्ता धरीत आहेत. त्यामुळे पूर्वी उमरग्यासह परिसरात प्रतिदिन ४ लाख लिटर विक्री होणारे डिझेल आता ३० हजार लिटरपर्यंत खाली आले आहे, हे विशेष. परिणामी राज्यातील सीमावर्ती भागातील अनेक पेट्राेलपंपांना टाळे लावण्याची नामुष्की ओढावली आहे.
उमरगा तालुका हा महाराष्ट्र-कर्नाटक राज्याचा सीमावर्ती भागात आहे. या सीमावर्ती भागातील वाहने आणि शेतकरी कर्नाटकात जाऊन बसवकल्याण, आळंद तालुक्यातील पंपावर इंधन भरत आहेत. तसेच मुंबई-हैदराबाद महामार्गावरील व गुलबर्गा-लातूर मार्गावरील वाहने कर्नाटक राज्यातील सीमेवरील पंपावर वाहनाची टाकी फुल्ल करतात. कारण कर्नाटक राज्यात महाराष्ट्रापेक्षा इंधन स्वस्त आहे. पेट्राेल ९ रुपयांनी, तर डिझेल ८ रुपयांनी स्वस्त आहे.
या इंधन स्वस्ताईचा फटका आता सीमावर्ती भागातील राज्यातील पेट्राेल पंपचालकांना बसू लागला आहे. इंधन विक्री जवळपास ठप्प झाली आहे. पूर्वी सर्व पेट्राेल पंपांवरून मिळून साधारपणे ४ लाख लिटर इंधन विक्री हाेत असे. आता हे प्रमाण अवघ्या ३० हजार लिटरपर्यंत खाली आले आहे.
तस्करीतून पैसे मिळवण्याचा धंदा फोफावला
कर्नाटकातून स्वस्त पेट्रोल-डिझेल आणायचे आणि महाराष्ट्रात विकायचे, असा नवाच धंदा यानिमित्ताने सीमावर्ती भागात फोफावला आहे. लिटरमागे आठ-नऊ रुपये मिळाले, तरी दिवसभराचा खर्च निघेल इतकी विक्री होते. सध्या असे प्रकार जोमात सुरू आहेत.
कर्नाटकात इंधन स्वस्त असल्याने तेथून तस्करी करून महाराष्ट्रात आणले जात आहे. तेथील स्वस्ताईमुळे महाराष्ट्रातील सीमेवरील पंप बंद पडले आहेत. दररोजचा उमरगा तालुक्यातील ४ लाख लिटरचा खप अवघ्या ३० हजार लिटरवर आला आहे. यावर तोडगा काढण्याची विनंती संघटनेने राज्य सरकारला वेळोवेळी केली आहे.
- रझाक अत्तार, अध्यक्ष, उमरगा तालुका पेट्रोल पंप संघटना
अशी आहे कर्नाटकातील स्वस्ताई
उमरगामध्ये बसवकल्याणमध्ये
पेट्रोल पेट्रोल
१२०.९२ १११.८८
डिझेल डिझेल
१०३.६१ ९५.५२
महाराष्ट्रापेक्षा ₹८.०९ स्वस्त (डिझेल)
महाराष्ट्रापेक्षा ₹९.०४ स्वस्त (पेट्रोल)