केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 09:17 PM2024-10-03T21:17:24+5:302024-10-03T21:18:05+5:30
bakery cakes : अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांना साशंकता आल्यावर केकचे नमुने एकत्र करण्यात आले आणि केकमध्ये वापरलेल्या घटकांची तपासणी करण्यात आली.
स्थानिक पातळीवर बनवलेल्या केकमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांमुळे कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत कर्नाटकच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांना साशंकता आल्यावर केकचे नमुने एकत्र करण्यात आले आणि केकमध्ये वापरलेल्या घटकांची तपासणी करण्यात आली. तपासणी केलेल्या केकच्या १२ नमुन्यांमध्ये कर्करोगास कारणीभूत पदार्थ आढळून आले.
विशेषत: रेड वेल्वेट आणि ब्लॅक फॉरेस्ट केकमध्ये जादा रंगांचा वापर केल्यामुळे ते मानवी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे या अहवालात म्हटले आहे. केकच्या १२ नमुन्यांमध्ये अलुना रेड, सनसेट यलो, पोनुसिया ४ आर, कॉर्मियोसिन आढळले आहेत. या कृत्रिम रंगांचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या कारणास्तव रेड वेल्वेट आणि ब्लॅक फॉरेस्ट केकसाठी रंग वापरण्यास मनाई आहे. अधिकाऱ्यांनी केक बनवणाऱ्यांना अन्न सुरक्षा विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचा इशारा दिला आहे.
राज्याच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने स्थानिक बेकरींना जास्त प्रमाणात कृत्रिम रंग असलेले केक विकण्यासंदर्भात चेतावणी दिली आहे. दरम्यान, आरोग्य अधिकाऱ्यांना २३५ पैकी २२३ केकचे नमुने खाण्यासाठी सुरक्षित आढळले, तर १२ नमुन्यांमध्ये कर्करोगाचा धोका निर्माण होणारे घटक आढळून आले. बहुतेक कृत्रिम रंग जसे की अलुना रेड, सनसेट यलो, पोनुसिया ४ आर, कॉर्मियोसिन हे रंगांचा रेड वेल्वेट आणि ब्लॅक फॉरेस्ट सारख्या केकमध्ये समावेश होता.
राज्य अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता नियामकाने एका निवेदनात म्हटले आहे की, कृत्रिम रंगांचा जास्त वापर केल्याने कर्करोगाचा धोका तर वाढतोच पण मानसिक आणि शारीरिक आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. अन्न सुरक्षा आयुक्त श्रीनिवास के यांनी देखील बेकरी चालकांना त्यांच्या केकमध्ये हानिकारक रसायने आणि कृत्रिम रंग हे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) निर्धारित केलेल्या मानकांपेक्षा जास्त वापरण्यासंदर्भात चेतावणी दिली आहे.