पुन्हा सत्ता आल्यास मुस्लिम नेत्याला मुख्यमंत्री बनवू - कुमारस्वामी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 02:26 PM2022-11-23T14:26:49+5:302022-11-23T14:27:45+5:30
H. D. Kumaraswamy : जनता दल सेक्युलरने असेही जाहीर केले आहे की, महिला, दलित आणि अल्पसंख्याक नेत्यांमधील उपमुख्यमंत्री बनवण्यासाठी विचार केला जाईल.
कर्नाटकात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र राजकीय पक्षांनी आत्तापासूनच मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातच आता जनता दल सेक्युलरचे (Janata Dal Secular) नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी एक मोठे विधान केले आहे. कर्नाटकात जेडीएसची सत्ता आल्यास पक्ष मुस्लिम नेत्याला मुख्यमंत्री बनवेल, असे विधान एचडी कुमारस्वामी यांनी केले आहे.
जनता दल सेक्युलरने असेही जाहीर केले आहे की, महिला, दलित आणि अल्पसंख्याक नेत्यांमधील उपमुख्यमंत्री बनवण्यासाठी विचार केला जाईल. जर परिस्थितीची मागणी झाल्यास पक्ष अल्पसंख्याक समुदायातील मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाही आहे. माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी म्हणाले, "फक्त जेडीएसजवळ अशा वादविवादाची तरतूद आहे आणि पक्ष मुस्लिम नेत्याबद्दल खूप मोकळा आहे."
माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंचरत्न यात्रेचा भाग म्हणून कोलार जिल्ह्याचा दौरा करत आहेत. यावेळी मुस्लिम मुख्यमंत्र्यांबाबत माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी म्हणाले, "पक्षाध्यक्ष सीएम इब्राहिम यांनी म्हटले आहे की, जनता दल सेक्युलर पुन्हा सत्तेत आल्यास त्यांनाही मुख्यमंत्री होण्याची संधी आहे. असे का होणार नाही?"
माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी मंगळवारी कोलारमध्ये म्हणाले, "वसंतनरसापुरा येथे एका दलित तरुणाने मला भेटून त्याच्या समस्या सांगितल्या. यानंतर मी जाहीर केले की, माझा पक्ष सत्तेवर आल्यास उपमुख्यमंत्रीपद दलितासाठी तयार केले जाईल." ते पुढे म्हणाले की, काँग्रेसमध्ये खूप संघर्ष केल्यानंतर जी परमेश्वर उपमुख्यमंत्री झाले आणि गोविंद करजोल यांचे नाव भाजपच्या हायकमांडला पुढे करावे लागले आणि हे दोन्ही नेते दलित समाजातून आलेले आहेत.
याचबरोबर, महिला व बालकल्याण विभाग पुरेसे काम करत नसल्याचा आरोप करत महिलांच्या विकासासाठी उपमुख्यमंत्रीपदी एका महिलेची नियुक्ती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सत्तेत आल्यावर रायथा चैतन्य (Raitha Chaitanya) नावाचा कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आणि कल्याणासाठी काम करणार असल्याचेही सांगितले.