"आम्ही सरकार चालवत नसून फक्त कसं तरी सांभाळतोय"; भाजपा मंत्र्याचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 08:12 PM2022-08-16T20:12:25+5:302022-08-16T20:13:59+5:30
मधुस्वामी आणि चन्नापटनाचे सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांच्यातील फोनवरील संभाषण आता समोर आले आहेत.
नवी दिल्ली - कर्नाटकचे कायदा मंत्री मधुस्वामी यांचं एक कॉल रेकॉर्डिंग सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामुळे सरकारच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. मधुस्वामी यांनी एका फोन कॉलवर "सरकार काम करत नाही, आम्ही कसं तरी ते सांभाळत आहोत", असं म्हटलं आहे. जेसी मधुस्वामी यांच्या कथित वक्तव्यावर काही मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनीही टीका केली आहे. मधुस्वामी आणि चन्नापटनाचे सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांच्यातील फोनवरील संभाषण आता समोर आले आहेत.
मधुस्वामी आणि चन्नापटना येथील सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांच्यातील फोनवरील संभाषण तुफान व्हायरल होत आहे. भास्कर यांनी वीएसएसएन बँकेबाबत शेतकऱ्यांच्या समस्या मधुस्वामी यांना सांगितल्या. यावेळी बोलताना मधुस्वामी यांनी आम्ही सरकार चालवत नसून फक्त कसं तरी सांभाळत आहोत, हे आपल्याला 7 ते 8 महिने असंच सुरू ठेवायचं असल्याचं म्हटलं आहे.
मंत्री मुनिरत्ना यांनी मधुस्वामी यांना अशा प्रकारचं वक्तव्य करण्यापूर्वी राजीनामा देण्याची गरज असल्याचं म्हटलं. मधुस्वामी यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, असं ते म्हणाले. मधुस्वामी सरकारचा भाग आहेत, मंत्रिमंडळात ते सहभागी होतात, या प्रकरणी त्यांची देखील जबाबदारी आहे, जबाबदार पदावर राहून ते असं वक्तव्य करु शकत नाहीत असं मुनिरत्ना म्हणाले. सहकार मंत्री एस.टी. सोमशेखर यांनी देखील मधुस्वामी यांच्यावर टीका केली आहे.
काँग्रेसने ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर बसवराज बोम्मई सरकारवर टीका केली आहे. कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी एन ए नारायण यांनी मधुस्वामी यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं नसेल. भ्रम निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचा कट करण्यात आला असेल, असं ते म्हणाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.