कर्नाटकात विरोधी पक्षनेतेपदी कोण? बसवराज बोम्मई यांच्यासह अनेक नावे शर्यतीत, आज भाजपची महत्त्वाची बैठक!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 09:26 AM2023-07-02T09:26:23+5:302023-07-02T10:50:56+5:30
विरोधी पक्षनेतेपदी कोण असेल या प्रश्नाला उत्तर देताना बसवराज बोम्मई यांनी शनिवारी चिक्कमगलुरू येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, रविवारी संध्याकाळी निश्चितपणे कळेल.
बंगळुरु : कर्नाटकातील (Karnataka) भाजपचे सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार अस्तित्वात आले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर भाजपमध्ये विरोधी पक्षनेता कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. भाजपच्या नेत्यांमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते. दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते कोण असेल, हे रविवारपर्यंत कळेल, असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे.
पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलैपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनापूर्वी पक्षनेते निवडण्यासाठी रविवारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. विरोधी पक्षनेतेपदी कोण असेल या प्रश्नाला उत्तर देताना बसवराज बोम्मई यांनी शनिवारी चिक्कमगलुरू येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, रविवारी संध्याकाळी निश्चितपणे कळेल.
या बैठकीची माहिती असलेल्या नेत्यांनी सांगितले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्षाचा मोठा पराभव आणि विरोधी पक्षनेत्याच्या निवडीला उशीर झालेल्या अंतर्गत संघर्षांवर अनेक महिन्यांच्या मतभेदानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, १३ मे रोजी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक मताधिक्य मिळवले आणि १३५ जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ ६६ जागांवर समाधान मानावे लागले.
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी अरुण सिंह यांनी याआधीच नवनिर्वाचित आमदारांचे मत जाणून घेतले असून, त्याआधारे आणि भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेच्या निकालानुसार विरोधी पक्षनेता निवडला जाण्याची शक्यता आहे. बसवराज बोम्मई आणि माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यतनाल या पदासाठी आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
हिंदुस्तान टाइम्सने पक्षातील आपल्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, विरोधी पक्षनेतेपदासाठी बसवराज बोम्मई, बसनागौडा पाटील यतनाल, अश्वथनारायण, व्ही सुनील कुमार आणि आर अशोक यासारख्या अनेक नावांचा विचार केला जात आहे. याशिवाय, श्रीनिवास पुजारी, तेजस्विनी गौडा आणि चालुवादी नारायण स्वामी हे विधान परिषदेचे संभाव्य उमेदवार आहेत, असे नेत्यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपकडून विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईबाबत सत्ताधारी काँग्रेससह अनेक स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याशिवाय, नियुक्ती विलंबासाठी मजबूत किंवा सक्षम चेहरा नसणे आणि भाजपमध्ये अंतर्गत कलह असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र, बसवराज बोम्मईसह भाजपच्या अनेक नेत्यांनी परंपरेप्रमाणे विधानसभेच्या पूर्ण अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाईल, असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.