Karnataka Assembly Election 2018- निवडणुकांमुळे उत्तर कर्नाटकातील विमानतळ गजबजले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 11:53 AM2018-04-24T11:53:03+5:302018-04-24T13:10:15+5:30
विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर आल्यामुळे विविध राजकीय पक्षांचे नेते, अभ्यासक, पत्रकार यांची वर्दळ कर्नाटकाच्या विविध भागांमध्ये वाढली आहे. कर्नाटकाच्या उत्तर भागातील एरव्ही फारसे चर्चेत नसणारे विमानतळ आता या येण्याजाण्याने चांगलेच गजबजले आहेत.
हुबळी- निवडणुकांमुळे केवळ राजकीय वातावरणात हालचाल वाढत नाही तर इतरही आर्थिक, सामाजिक घडामोडी घडत असतात असे म्हटले जाते. कर्नाटकात सध्या अशीच परिस्थिती दिसून येत आहे. विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर आल्यामुळे विविध राजकीय पक्षांचे नेते, अभ्यासक, पत्रकार यांची वर्दळ कर्नाटकाच्या विविध भागांमध्ये वाढली आहे. कर्नाटकाच्या उत्तर भागातील एरव्ही फारसे चर्चेत नसणारे विमानतळ आता या येण्याजाण्याने चांगलेच गजबजले आहेत.
उत्तर कर्नाटकात बेळगाव, हुबळी, बिदर (भारतीय वायूसेनेचा तळ), तोरणगळ्ळू (बळ्ळारी जिल्हा), बलदोटा-कोप्पळ इथल्या विमानतळावर प्रचारासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या कार्यकर्ते व नेत्यांमुळे हालचाल वाढली आहे. कमीत कमी वेळेत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांचे नेते विमानप्रवासाला पहिली पसंती देत असल्याचे या येण्या-जाण्यामुळे दिसून येत आहे.
हुबळीच्या विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपी प्रवासी या प्रचाराच्या काळात येऊन गेले आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काही दिवसांपुर्वीच तोरणगळ्ळू येथे असणाऱ्या जिंदाल विद्यानगर विमानतळाचा वापर केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच उत्तर कर्नाटकाच्या दौऱ्यावर येणार आहेत. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे एच. डी. देवेगौडा आणि एच. डी कुमारस्वामी यांच्याही उत्तर कर्नाटकात सभा होणार असून या नेत्यांबरोबर येणारे राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही येथिल विमानतळांचा वापर करतील.