Karnataka elections: आरआर नगरातील निवडणूक पुढे ढकलली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 08:50 PM2018-05-11T20:50:59+5:302018-05-11T20:50:59+5:30
मतदारसंघात १२ मे रोजी होणारी निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय कर्नाटक निवडणूक आयोगानं घेतला आहे.
बंगळुरू- कर्नाटकमधील आरआरनगर विधानसभा क्षेत्रातील एका फ्लॅटमधूल मोठ्या संख्येने बनावट निवडणूक ओळखपत्र सापडले होते. त्यामुळेच या मतदारसंघात १२ मे रोजी होणारी निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय कर्नाटक निवडणूक आयोगानं घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार या मतदारसंघात १२ मे ऐवजी आता २८ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे, तर मजमोजणी ३१ मे रोजी होणार आहे.
आरआर नगरमधील जलाहल्लीतील एका फ्लॅटमध्ये गेल्या मंगळवारी (ता. 1 मे) १० हजार बनावट निवडणूक ओळखपत्रं जप्त केली होती. त्यावेळी मतदार यादीत नाव टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या फॉर्म नंबर ७ च्या हजारो काउंटर फाइल्स जप्त करण्यात आल्या होत्या. भरारी पथकाला इथे काँग्रेसचे उमेदवार एन. मणिरत्ना यांच्या नावाचे फॉर्म सापडले होते. घडलेल्या प्रकारानंतर जनता दल धर्मनिरपेक्ष आणि भारतीय जनता पक्षाने इथली निवडणूक रद्द करण्याची मागणीही केली होती.
दरम्यान, ज्या फ्लॅटमधून बनावट कार्ड इतर साहित्य जप्त करण्यात आले तो फ्लॅट भाजपा नेत्या मंजुळा नंजामारी यांचा असल्याचं निष्पन्न झालं. याबरोबच या फ्लॅटमध्ये भाडेकरू असलेला राकेश हा भाजपाचा कार्यकर्ताच असल्याचं स्पष्ट झालं. तसंच राकेश हा मंजुळा यांचा नातेवाईक असल्याचेही पुढे स्पष्ट झालं. या प्रकारामुळे काँग्रेसला भाजपावर टीका करण्याची संधी मिळाली.