डझनभर जागांवर बंडखोरांमुळे या राज्यात भाजपचे बिघडू शकते गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 10:46 AM2024-04-04T10:46:23+5:302024-04-04T10:47:22+5:30
Karnataka Lok Sabha Election 2024: कर्नाटकात भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांची बंडखोरी सुरूच आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कर्नाटक दौरा आणि बंडखोर नेत्यांशी वन टू वन चर्चा होऊनही असंतोष थांबलेला नाही.
- संजय शर्मा
नवी दिल्ली - कर्नाटकात भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांची बंडखोरी सुरूच आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कर्नाटक दौरा आणि बंडखोर नेत्यांशी वन टू वन चर्चा होऊनही असंतोष थांबलेला नाही.
गेल्या निवडणुकीत भाजपने कर्नाटकात २८ पैकी २६ जागा जिंकल्या होत्या, मात्र यावेळी बंडखोर आणि असंतुष्ट भाजप नेते किमान डझनभर जागांवर भाजपचा खेळ बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. ही परिस्थिती पाहून अमित शाह यांनी स्वत: कर्नाटकात जाऊन नाराज नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अमित शाह यांनी बंगळुरूला जाऊन नाराज नेत्यांशी वन टू वन चर्चा केली. भाजपचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी शिवमोगा येथून बी.एस. येडियुरप्पा यांचे पुत्र राघवेंद्र यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत.
संगन्ना कराडी यांना कोप्पलमधून तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भाजप उमेदवाराला पराभूत करण्याची शपथ घेतली आहे. तुमकूरमधील भाजपचे उमेदवार व्ही. सोमन्ना यांना बाहेरचे उमेदवार असल्याचे सांगत माजी मंत्री मधुस्वामी विरोध करत आहेत
सदानंद गौडाही नाराज
बंगळुरू उत्तरमध्ये माजी केंद्रीय मंत्री सदानंद गौडा तिकीट नाकारल्याने नाराज आहेत. म्हैसूरमधून प्रताप सिम्हा यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. बी.एस. येडियुरप्पा यांची पक्षात पहिल्यासारखी पकड राहिलेली नाही.