कर्नाटकचे लोकायुक्त राव यांचा राजीनामा
By admin | Published: December 8, 2015 11:34 PM2015-12-08T23:34:47+5:302015-12-08T23:34:47+5:30
कथित खंडणी वसुली व लाच प्रकरणात मुलाचा सहभाग असल्याच्या आरोपावरून कर्नाटकचे लोकायुक्त वाय. भास्कर राव यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
बंगळुरू : कथित खंडणी वसुली व लाच प्रकरणात मुलाचा सहभाग असल्याच्या आरोपावरून कर्नाटकचे लोकायुक्त वाय. भास्कर राव यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल वजुभाईवाला यांनी त्यांचा राजीनामा त्वरित मंजूर केला.
खंडणी व लाच व्यवहारासाठी लोकायुक्त कार्यालय व निवासस्थानाचा वापर केल्याप्रकरणी राव यांचा मुलगा आश्विन राव याला अटक करण्यात आली होती. मुलाच्या अटकेनंतर राव जुलैमध्ये दीर्घ सुटीवर गेले होते. त्यांना हटविण्यासाठी राज्य विधिमंडळात प्रस्तावही आणला गेला होता. याचदरम्यान मंगळवारी अचानक त्यांनी पदाचा राजीनामा दिला.
राव यांचा मुलगा आश्विन हा वरिष्ठ सरकारी अधिकारी व राजकीय नेत्यांना लोकायुक्त धाडी टाकण्याची धमकी देत त्यांच्याकडून खंडणी वसूल करीत असल्याचे उघड झाल्यानंतर राव अडचणीत आले होते. या प्रकरणी आश्विन व पाच दलाल अटकेत आहेत. या प्रकरणानंतर राव यांना हटविण्याची मागणी जोर धरू लागली होती. (वृत्तसंस्था)