...म्हणून कर्नाटकच्या मंत्र्यानं खासदारांना वाटले 1 लाखाचे आयफोन एक्स
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 01:31 PM2018-07-18T13:31:38+5:302018-07-18T13:40:13+5:30
कर्नाटकच्या जलसंपदा मंत्र्यांकडून सर्व खासदारांना आयफोन एक्स गिफ्ट
बंगळुरु: कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी स्वत:च्या कामाला तपस्या म्हणत असताना त्यांचे मंत्री मात्र लाखो रुपयांचे स्मार्टफोन 'गिफ्ट' म्हणून वाटत आहेत. कर्नाटक सरकारचे जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी कावेरी नदीच्या पाणी वाटप प्रश्नावर राज्याच्या खासदारांची बैठक घेतली. यावेळी बैठकीला उपस्थित असणाऱ्या 38 खासदारांना भेट म्हणून आयफोन एक्स देण्यात आले. या फोनची किंमत तब्बल 1 लाख रुपये आहे.
मंगळवारी झालेल्या बैठकीत लोकसभेच्या 26 (बी. एस. येडियुरप्पा आणि बी. श्रीरामुलु यांना सोडून) आणि राज्यसभेच्या 12 खासदारांना आयफोन एक्स (256 जीबी) भेट म्हणून देण्यात आले. याशिवाय खासदारांना लेदरची बॅगदेखील देण्यात आली. या बॅगची किंमत 5 हजार रुपये इतकी आहे. मात्र भाजपाच्या 18 खासदारांनी या भेटवस्तू स्वीकारलेल्या नाहीत. या महागड्या भेटवस्तूंवर भाजपानं कर्नाटक सरकारवर निशाणा साधला आहे. 'कावेरी मुद्यावर चर्चा करण्यासाठी सर्व खासदारांना चर्चेला बोलावल्याबद्दल मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा आभारी आहे. मात्र अशा महागड्या भेटवस्तू खासदारांना का दिल्या जात आहेत? सत्तासंचलनाला तुम्ही तपस्या म्हणता, कर्मचाऱ्यांना वेतन दिलं जात नाही आणि तुम्ही जनतेच्या पैशाचा वापर महागड्या भेटवस्तू देण्यासाठी करत आहात. मी तुम्हाला भेटवस्तू परत करत आहे,' असं ट्विट भाजपाचे खासदार राजीव चंद्रशेखर यांनी केलं आहे.
जलसंपदा मंत्री शिवकुमार यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. जलसंपदा विभागानं आयफोन एक्सची खरेदी केलेली नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. 'कावेरी मुद्याशी संबंधित कागदपत्रं खासदारांना एक बॅगमधून देण्यात आली होती. आयफोनची भेट माझ्याकडून खासदारांना देण्यात आली. तो माझा निर्णय होता. ही भेट खासगी स्वरुपाची होती,' असं शिवकुमार यांनी म्हटलं.