Karnataka Politics : कर्नाटकात राजकीय खळबळ, सरकारमधील मंत्र्यानेच मुख्यमंत्र्यांविरोधात पुकारले बंड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 22:38 IST2021-03-31T22:37:02+5:302021-03-31T22:38:15+5:30
Karnataka Politics : मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप के. एस. ईश्वरप्पा यांनी केला आहे.

Karnataka Politics : कर्नाटकात राजकीय खळबळ, सरकारमधील मंत्र्यानेच मुख्यमंत्र्यांविरोधात पुकारले बंड!
बंगळुरू : कर्नाटकातील बहुचर्चित ऑपरेशन लोटसप्रकरणी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (CM BS Yediyurappa) यांना बंगळुरू हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यास हायकोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे बीएस येडियुरप्पा यांच्यासमोर अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याताच आता त्यांच्याच सरकारमधील मंत्री के. एस. ईश्वरप्पा (KS Eshwarappa) यांनी बीएस येडियुरप्पा यांच्याविरुद्ध बंड पुकारले आहे. (karnataka minister ks eshwarappa writes to governor vajubhai vala alleging interference by cm bs yediyurappa)
मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप के. एस. ईश्वरप्पा यांनी केला आहे. त्यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांना पत्र लिहून बीएस येडियुरप्पा यांची तक्रार केली आहे. याचबरोबर, राज्य सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री असलेल्या के. एस. ईश्वरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही त्यांच्या पत्राची प्रत पाठविली आहे.
मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी आपल्या विभागाची परवानगी न घेता 774 कोटी रुपये वाटप केल्याचा आरोप के. एस. ईश्वरप्पा यांनी केला आहे. तसेच, या वाटपामध्ये पक्षपात केल्याचा आरोपही के. एस. ईश्वरप्पा यांच्याकडून करण्यात आला आहे.
कर्नाटकातील 'ऑपरेशन लोटस'ची चौकशी होणार
दरम्यान, कर्नाटकातील बहुचर्चित ऑपरेशन लोटसप्रकरणी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना बंगळुरू हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यास हायकोर्टाने परवानगी दिली आहे. जनता दल सेक्युलरचे नेते नगन गौडा यांचे चिरंजीव शरण गौडा यांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. हा एफआयआर रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टाने हा एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे.
ऑडिओ क्लिपने खळबळ
कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यासाठी 2019मध्ये भाजपा नेते येडियुरप्पा यांनी ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. त्याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. वडिलांना राजीनामा द्यायला सांग किंवा पक्ष सोडायला सांग असे येडियुरप्पा एका आमदाराच्या मुलाला सांगत असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ही ऑडिओ क्लिप आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.