बसमध्ये महिलेच्या सीटवर सहप्रवाशाने केली लघवी, कर्नाटकातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 04:35 PM2023-02-23T16:35:26+5:302023-02-23T16:35:53+5:30
काही दिवसांपूर्वी विमानात लघवी केल्याचे समोर आले होते, आता बसमध्येही तशाच प्रकारची घटना घडली आहे.
चालू प्रवासात खुलेआम लघवी केल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. यावेळी कर्नाटकातील एका बसमध्ये प्रवाशाने महिलेच्या सीटवर लघवी केल्याची घटना घडली आहे. ही कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (KSRTC) द्वारे चालवली जाणारी सरकारी बस होती. यापूर्वी अमेरिकेहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाने महिलेवर लघवी केल्याची घटना समोर आली होती.
जेवणासाठी बस ढाब्यावर थांबली
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हुबळीजवळ एका 32 वर्षीय व्यक्तीने बस क्रमांक(KA-19 D-3554) मध्ये लघवी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही सरकारी स्लीपर बस विजयपुराहून मंगळुरूला जात होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 32 वर्षीय पुरुषाने 20 वर्षीय मुलीने बुक केलेल्या महिला सीटवर लघवी केली. हुबळीजवळील किरेसूर येथील ढाब्यावर रात्रीच्या जेवणासाठी बस थांबली होती, यावेळी ही घटना घडली. या घटनेनंतर बसमध्ये एकच गोंधळ उडाला.
जून महिन्यात न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात लघवी केल्याची घटना उघडकीस आली होती. बिझनेस क्लासमध्ये एका मद्यधुंद व्यक्तीने शेजारील सीटवर बसलेल्या महिला प्रवाशावर लघवी केली होती. ही बाब समोर आल्यानंतर एअर इंडियाची चांगलीच कोंडी झाली आणि कंपनीलाही आपले नियम बदलावे लागले. एवढेच नाही तर लघवी करणाऱ्याला अनेक दिवस तुरुंगात राहावे लागले. मात्र, नंतर त्याला न्यायालयातून जामीन मिळाला.