कर्नाटकात पावसामुळे कॉफी आणि मसाल्याच्या पिकांचे नुकसान; 12 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 05:01 PM2018-08-21T17:01:46+5:302018-08-21T17:04:30+5:30
कोडुगू, चिकमंगळूर, हसन या जिल्ह्यांतील कॉफीच्या उत्पादनात या पावसामुळे 50 टक्के घट होणार आहे. भारतातील एकूण कॉफी उत्पादनापैकी 70 टक्के उत्पादन या तीन जिल्ह्यांमध्ये होते.
बंगळुरु- केरळपाठोपाठ कर्नाटकमध्येही जोरदार पाऊस झाला आहे. राज्याच्या कोडुगू जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरु असून अनेक गावांना पुराचा तडाखा बसला आहे. या जिल्ह्यातील काळी मिरी, वेलदोडा आणि कॉफीच्या पिकाचे नुकसान झाले आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार कोडुगू, चिकमंगळूर, हसन या जिल्ह्यांतील कॉफीच्या उत्पादनात या पावसामुळे 50 टक्के घट होणार आहे. भारतातील एकूण कॉफी उत्पादनापैकी 70 टक्के उत्पादन या तीन जिल्ह्यांमध्ये होते. पावसामुळे कोडुगूच्या डोंगराळ प्रदेशात अनेक लोक अडकून पडले आहेत. त्यांच्या मदतीसाठी एनडीआरएफ, नौदल आणि लष्कराच्या टीम्स कार्यरत आहेत. हवामान खात्याने उडुपी, उत्तर कन्नड आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
या पावसामुळे 12 लोकांचे प्राण गेल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली आहे.
कोडुगू जिल्ह्यातील लोकांना मदत करण्यासाठी कुमारस्वामी यांनी केंद्राकडे 100 कोटी रुपयांचा निधी मागितला आहे. पंतप्रधानांनी केरळला 500 कोटी रुपयांची मदत केली आहे. त्यांनी कोडुगूसाठी किमान 100 कोटी रुपये द्यावेत अशी मागणी कुमारस्वामी यांनी केली. कोडुगूमध्ये रस्त्यांचे नुकसान झाले असून त्याची दुरुस्ती करावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोडुगूमधील 845 घरांचे पूर्णतः नुकसान झाले असून 773 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. 6620 लोकांना 50 आश्रयछावण्यांमध्ये हलविण्यात आले असून पावसाचा तडाखा बसलेल्या कुटुंबाना प्राथमिक मदत म्हणून 3800 रुपये आणि धान्य देण्यात आले आहे.
Across Kerala & now Kodagu in Karnataka, heavy rainfall has caused widespread devastation. This is the time for our workers & leaders to demonstrate the core Congress values of service & love. Please focus all our resources & people to help those in need. pic.twitter.com/H7MWKaPdGA
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 17, 2018
कर्नाटकच्या मंत्र्यांनी फेकले बिस्किटांचे पुडे
कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे बंधू आणि मंत्री एच. डी. रेवण्णा नव्या वादात सापडले आहेत. पूरग्रस्तांना मदतकार्य करण्याच्या नावाखाली त्यांच्या अंगावर बिस्किटांचे पुडे फेकण्याचा प्रकार त्यांनी केला आहे. कर्नाटकच्या हसन जिल्ह्यातील आश्रयछावणीमध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे रेवण्णा यांच्यावर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. रेवण्णा 'असंवेदनशील' असल्याची टीका त्यांच्यावर होत आहे.
एच.डी. रेवण्णा हसन जिल्ह्यामध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गेले होते. यावेळेस बिस्किटांचे पुडे लोकांच्या हातामध्ये देणे शक्य असूनही ते त्यांच्या दिशेने फेकत असल्याचे व्हीडिओमध्ये दिसत आहे. हा व्हीडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर रेवण्णा यांनी किमान संवेदनांचे भान राखत वागायला हवे होते अशा भावना व्यक्त होत आहेत. रेवण्णा यांच्याबरोबर अर्कालगुडुचे मदार एटी रामस्वामीसुद्धा उपस्थित होते.