Karnataka Resigne : मी पुन्हा येईनला 'कन्नड' भाषेत काय म्हणतात, आमदाराच्या प्रश्नावर मिळालं 'हे' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 09:43 PM2021-07-26T21:43:07+5:302021-07-26T21:44:18+5:30
Karnataka Resigne : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी विधानसभेत केलेल्या भाषणात मी पुन्हा येईन... ही कविता म्हणून दाखवली होती. तसेच, आपणच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार... हा आशावादही त्यांनी व्यक्त केला होता
मुंबई - भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. सोमवारी दुपारी त्यांनी राज्यपाल थावरचंद गहलोत यांना आपला राजीनामा सोपवला. त्यानंतर आता येडियुरप्पा काय करणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत त्यांनी स्वतः खुलासा केला आहे. यापुढे फक्त राज्याच्या कल्याणासाठी काम करणार, असे ते म्हणाले. मात्र, कर्नाटकातील राजकीय घडामोडीवर काँग्रेस आमदाराने खोचक ट्विट केलं आहे. काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांनी एक प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी विधानसभेत केलेल्या भाषणात मी पुन्हा येईन... ही कविता म्हणून दाखवली होती. तसेच, आपणच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार... हा आशावादही त्यांनी व्यक्त केला होता. मात्र, राज्यात महाविकास आघाडी तयार झाली. शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार बनवलं अन् महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईन... हे वाक्य चांगलंच गाजलं, त्यांना ट्रोलही करण्यात आलं आहे.
काँग्रेस नेते आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी आता हाच धागा पकडत कर्नाटकच्या राजकीय घडामोडींवरुन देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला आहे. पाटील यांनी, मी पुन्हा येईनला... कन्नड भाषेत काय म्हणतात.. असा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नावर काहींनी उत्तर दिलं आहे. काहींनी कन्नड भाषेतच हे उत्तर दिलं आहे.
"मी पुन्हा येईन" ला कन्नड भाषेत काय म्हणतात ?#KarnatakaPolitics
— Kunal Patil (@Kunal_R_Patil) July 26, 2021
ನಾನು ಮತ್ತೆ ಬರುತ್ತೇನೆ हे कन्नड भाषेतील शब्द असून त्याचा मराठी उच्चार नानू अरमावतेने मत्ते निनू असा होतो, असेही काहींनी सांगितले आहे.
मी दबावाखाली राजीनामा दिला नाही - येडीयुरप्पा
दरम्यान, 78 वर्षीय येडियुरप्पा म्हणाले की, राज्य सोडून इतर कुठे जाणार नाही. कर्नाटकमध्येच राहून राज्याच्या कल्याणासाठी काम करणार. यावेळी त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर नाराज असल्याच्या आणि दबावाखाली येऊन राजीनामा दिल्याच्या वृत्तांचे खंडन केले. ते म्हणाले की, कुणीच माझ्यावर राजीनाम्यासाठी दबाव टाकला नाही. राजीनाम्याचा निर्णय माझा स्वतःचा होता. मी पुढच्या निवडणुकीत भाजपला सत्तेत आणण्यासाठी काम करेल. तसेच, पक्ष नेतृत्वाने दिलेले जबाबदारी योग्यरित्या हाताळेल, असेही ते म्हणाले.