सॉफ्टवेअर कंपनीतील नोकरी सोडून ‘गधा मेहनत’; गाढविणीचे दूध विकून लाखोंची कमाई!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 08:00 AM2022-06-14T08:00:14+5:302022-06-14T08:01:09+5:30
एखाद्याला हिणवण्यासाठी ‘काय गाढव आहेस’ असे आपण सर्रास म्हणतो. पण, कर्नाटकात एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वीच चक्क गाढवांचा फार्म सुरू केला आहे.
बंटवाल (कर्नाटक) :
एखाद्याला हिणवण्यासाठी ‘काय गाढव आहेस’ असे आपण सर्रास म्हणतो. पण, कर्नाटकात एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वीच चक्क गाढवांचा फार्म सुरू केला आहे. ऐकून आश्चर्य वाटत असलं तरी गाढवांच्या फार्ममधून दूध विकून ही व्यक्ती सध्या लाखो रुपयेदेखील कमावतेय.
गाढवांची दुर्दशा न बघवल्याने डाँकी फार्म कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बंटवाल येथे श्रीनिवास गौडा नावाच्या ४२ वर्षीय व्यक्तीने ८ जूनला गाढवांचे फार्म सुरू केले आहे. विशेष म्हणजे गाढवांची दुर्दशा न बघवल्याने डाँकी फार्म सुरू केल्याचे त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. हे ‘डाँकी फार्म’ कर्नाटकातील पहिले आणि केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यानंतरचे देशातील दुसरे अशा प्रकारचे फार्म आहे.
गाढवाचे दूध महाग, औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण : देशात गाढवांच्या प्रजातींची संख्या कमी होत आहे. आता धोबींच्या व्यवसायात कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन आणि इतर तंत्रे वापरली जात आहेत. त्यामुळे गाढवांचा वापर कमी झाला आहे. गाढवांचे फार्म सुरू करण्याची कल्पना मित्रांना सांगितली तेव्हा त्यांनीही खिल्ली उडविली. लोकांनी अनेक शंका उपस्थित केल्या; पण गाढवाचे दूध चवदार, खूप महाग आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्णदेखील आहे.
...म्हणून सुरू केले गाढवाचे फार्म
बी.ए. पदवीधर असलेल्या गौडा यांनी २०२० मध्ये सॉफ्टवेअर कंपनीतील नोकरी सोडली आणि इरा गावात २.३ एकर जागेवर कृषी, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय सेवा, प्रशिक्षण आणि चारा विकासासाठी एकात्मिक केंद्र सुरू केले. त्यांनी सर्वप्रथम शेतात शेळीपालन सुरू केले. यासोबतच त्यांच्या शेतात ससे आणि कडकनाथ कोंबड्या आहेत. ते म्हणाले की, आता २० गाढवांसह गाढव फार्म सुरू करण्यात आले आहे.
मिळाली १७ लाख रुपयांची ऑर्डर
- लोकांना पॅकेटमध्ये गाढवाचे दूध पुरविण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. ३० मिली दुधाच्या पॅकेटची किंमत १५० रुपये असेल आणि ते मॉल्स, दुकाने आणि सुपरमार्केटमध्ये पुरविले जाईल, असे ते म्हणाले.
- सौंदर्य उत्पादनांसाठीही हे दूध विकण्याची त्यांची योजना आहे. या दुधासाठी १७ लाख रुपयांच्या ऑर्डर आधीच मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.