कर्नाटक : कुमारस्वामी - येडियुरप्पा यांच्यात खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 04:11 PM2018-09-21T16:11:14+5:302018-09-21T16:17:03+5:30
कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यापासून सुरू झालेला राजकीय संघर्ष दररोज नवनवी वळणे घेत आहे.
बंगळुरू - कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यापासून सुरू झालेला राजकीय संघर्ष दररोज नवनवी वळणे घेत आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. येडियुरप्पा यांनी माझ्या सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आपणही लोकांना त्यांच्याविरोधात उठाव करण्यासाठी आवाहन करू, असे कुमारस्वामी यांनी सांगितले. तसेच भ्रष्टाचार प्रकरणातील येडियुरप्पा यांच्या जुन्या खटल्यांची आठवण करून देत राज्य सरकार आपल्याकडे असल्याचा इशाराही कुमारस्वामी यांनी दिला.
दरम्यान, कुमारस्वामी यांच्या इशाऱ्यानंतर येडियुरप्पा यांनीही जोरदार पलटवार करताना कुमारस्वामींकडे राज्य सरकार असेल तर आमच्याकडे केंद्र सरकार आहे असा इशारा दिला.
हसनमधील उदयगिरी येथे एका कार्यक्रमादरम्यान कुमारस्वामी यांनी येडियुरप्पा आणि भाजपावर जोरदार टीका केली. गैरमार्गाने वापरलेल्या पैशाचा वापर करून माझ्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत आहे. जर असे झाले तर या पुण्यभूमीतील लोकांना भाजपाविरोधात उठाव करण्याचे आवाहन मी करेन, असे कुमारस्वामी म्हणाले.
देवेगौडा परिवाराने राज्याच्या संपत्तीची लूट केल्याचेा आरोप येडियुरप्पा यांनी केला होता. त्यामुळे कुमारस्वामी संतप्त झाले आहे. तसेच येडियुरप्पा हे राज्यातील जेडीएस-काँग्रेस सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील असून, सत्ताधारी पक्षातील १५ ते २० सदस्य त्यांच्या सोबत असल्याचा दावा कर्नाटकमधील राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहे.