कर्नाटकचे प्रवीण सूद सीबीआयचे नवे संचालक, काँग्रेसच्या आरोपानंतर आले होते चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 09:23 AM2023-05-15T09:23:04+5:302023-05-15T09:23:26+5:30
केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने हे आदेश काढले आहेत.
नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकीचे निकाल हाती येण्याच्या दुसऱ्याच दिवशी कर्नाटकचेपोलिस महासंचालक प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने हे आदेश काढले आहेत.
सूद हे कर्नाटक कॅडरचे १९८६ च्या तुकडीचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत. विद्यमान संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ २५ मे रोजी पूर्ण होत आहे. तेथून पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी सीबीआयचे संचालक म्हणून सूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मूळचे हिमाचलचे
सूद यांची तीन वर्षांपूर्वी राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते मूळचे हिमाचल प्रदेशचे असून, आयआयटी-दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत. मार्चमध्ये काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी पोलिस महासंचालक राज्यातील भाजप सरकारला साथ देत असल्याचा आरोप केल्यानंतर सूद प्रसिद्धी झोतात आले होते. ते काँग्रेस नेत्यांवर गुन्हे दाखल करत असल्याचा दावा करत शिवकुमार यांनी त्यांच्या अटकेचीही मागणी केली होती.