Lokendra Singh Kalvi : करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांचे निधन, SMS हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 09:43 AM2023-03-14T09:43:12+5:302023-03-14T09:45:08+5:30
Lokendra Singh Kalvi : करणी सेनेची स्थापना करणारे लोकेंद्र सिंह कालवी अनेक वर्षांपासून आपल्या समाजाच्या हितसंबंध आणि मागण्यांबाबत सक्रिय होते.
जयपूर : करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एसएमएस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याआधी लोकेंद्र सिंह कालवी हे ब्रेन स्ट्रोकमुळे आजारी होते. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, हॉस्पिटलमध्ये असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. लोकेंद्र सिंह कालवी यांच्यावर नागौर जिल्ह्यातील कालवी गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकेंद्र सिंह कालवी यांना ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. जून 2022 पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. करणी सेनेची स्थापना करणारे लोकेंद्र सिंह कालवी अनेक वर्षांपासून आपल्या समाजाच्या हितसंबंध आणि मागण्यांबाबत सक्रिय होते. तसेच, लोकेंद्र सिंह कालवी हे अनेक प्रकरणांमुळे चर्चेत राहिले. विशेषत: राजपूत समाजाच्या अभिमानाबद्दल ते अतिशय सजग होते. दरम्यान, लोकेंद्र सिंह कालवी यांचे वडील कल्याण सिंह कालवी हे देखील काही काळ राज्य आणि केंद्रात मंत्री होते.
लोकेंद्र सिंह कालवी यांनीही निवडणूक लढवली होती
लोकेंद्र सिंह कालवी हे सामाजिक प्रश्नांसोबतच राजकारणातही सक्रिय होते. त्यांनी नागौरमधून लोकसभा निवडणूकही लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 1998 मध्ये त्यांनी बाडमेरमधून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली, पण यावेळीही त्यांचा पराभव झाला. 2003 मध्ये, त्यांनी इतर काही लोकांसह एक सामाजिक व्यासपीठ तयार केले आणि आरक्षणाची मागणी करणारी मोहीम सुरू केली होती.
वडील होते मंत्री
लोकेंद्र सिंह कालवी यांना राजकारणाचा वारसा लाभला होता. त्यांचे वडील कल्याण सिंह कालवी हे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. तसेच, ते चंद्रशेखर यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक होते, असे म्हटले जाते. लोकेंद्र सिंह कालवी यांनी अजमेरच्या मये कॉलेजमध्ये शिक्षण घेतले होते.