'पद्मावत'मध्ये राजपूतांच्या शौर्याचं दर्शन, सिनेमाला विरोध करणार नाही - करणी सेना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 12:24 PM2018-02-03T12:24:48+5:302018-02-03T13:24:31+5:30
संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' या सिनेमाला आता राजपूत करणी सेना विरोध करणार नाही.
नवी दिल्ली - संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमाला आता राजपूत करणी सेना आता विरोध करणार नाही. सिनेमामध्ये राजपूतांचं शौर्य दाखवण्यात आले आहे, यामुळेच आता सिनेमाला विरोध न करण्याचा निर्णय संघटनेकडून घेण्यात आला आहे. करणी सेनेनं याबाबतची घोषणा शुक्रवारी (2 फेब्रुवारी) केली आहे. राष्ट्रीय राजपूर करणी सेनेचे नेते योगेंद्र सिंह कटार यांनी सांगितले की, सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह यांच्या आदेशानुसार सिनेमाला विरोध न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
करणी सेनेतील काही सदस्यांनी मुंबईमध्ये शुक्रवारी पद्मावत सिनेमा पाहिला. सिनेमामध्ये राजपूतांनी दिलेले बलिदान व त्यांच्या शौर्याचं वर्णन करण्यात आले आहे. प्रत्येक राजपूताला अभिमान वाटले, असा हा सिनेमा आहे, अशी प्रतिक्रिया करणी सेनेनं सिनेमा पाहिल्यानंतर दिली. सिनेमामध्ये दिल्लीतील सुलतान अलाउद्दीन खिलजी आणि राणी पद्मावती यांच्यादरम्यान कोणतेही आक्षेपार्ह असे दृश्य चित्रित करण्यात आलेले नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन करणी सेनेनं सिनेमाला विरोध न करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर 'पद्मावत' राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील सिनेमागृहांमध्ये रिलीज करण्यासाठी प्रयत्न करणी सेना करणार आहे, असेही योगेंद्र सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, पद्मावत सिनेमाच्या शुटिंगपासूनच करणी सेनेनं तीव्र निदर्शनं करण्यास सुरुवात केली होती. जयपूरमध्ये सिनेमांचं शुटिंग सुरू असताना दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळी यांच्यावर करणी सेनेनं हल्ला केला होता. यानंतर सेटवर जाळपोळ व तोडफोडदेखील करण्यात आली होती. शिवाय, सिनेमाच्या रिलीजवर बंदी आणण्यासाठी हिंसक आंदोलनंदेखील करण्यात आली होती. हिंसाचार आणखी उफाळून नये, यासाठी खबरदारी म्हणून चार राज्यांमध्ये सिनेमा रिलीजदेखील करण्यात आलेला नाही.