लोहरी रंग लाई! 74 वर्षांनी भेटले दोन ‘सगे भाई’; करतारपूर कॉरिडॉरने दिले भावाच्या नात्याला नवे परिमाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 08:08 AM2022-01-14T08:08:54+5:302022-01-14T08:09:07+5:30
दोन्ही भावांमधील प्रेम पाहून उपस्थितांनाही गहिवरुन आले. दोन्ही भावांच्या भेटीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
- बलवंत तक्षक
नवी दिल्ली : भारत- पाकिस्तान फाळणीदरम्यान वेगळे झालेल्या मोठ्या भावाची कधी भेट होईल, असे लुधियानाच्या हबीब यांना स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, ही भेट प्रत्यक्षात साकार झाली तेव्हा या भावांनी गळाभेट घेत अश्रुंना वाट करुन दिली. पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील फुल्लांवाला गावात राहणारे हबीब यांचे स्वप्न ७४ वर्षांनंतर जेव्हा पूर्ण झाले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांच्यापासून वेगळे झालेले भाऊ मुहम्मद सिद्दीकी (८०) हे त्यांना करतारपूर कॉरिडॉरमध्ये भेटले तेव्हा गळाभेट घेत या भावांनी आनंदाश्रुंना वाट करुन दिली.
दोन्ही भावांमधील प्रेम पाहून उपस्थितांनाही गहिवरुन आले. दोन्ही भावांच्या भेटीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लोकही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. भारतातून मोठ्या संख्येने शीख भाविक दरवर्षी करतारपूरला जातात. करतारपूर कॉरिडॉरमध्ये गतवर्षी नोव्हेंबरमध्ये ७३ वर्षांनंतर अचानक दोन मित्रांची भेट झाली होती.
अविस्मरणीय भेटी
- भारतातील सरदार गोपाल सिंह (९४) आणि पाकिस्तानातील मुहम्मद बशीर (९१) यांची भेट अशीच अविस्मरणीय ठरली होती.
- यापूर्वी २०१९ मध्ये करतारपूर कॉरिडॉरमध्ये दोन भाऊ भेटले होते.
- भारतात राहणारे दलबीर सिंह आणि त्यांचे चुलत भाऊ अमीर सिंह यांची भेट झाली होती.