तुटलेल्या फोनवर कोडिंग शिकला, आता थेट Harvard University मध्ये पोहोचला; शेतकऱ्याच्या १२ वर्षीय मुलाची अभिमानास्पद कहाणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 08:44 PM2022-07-30T20:44:10+5:302022-07-30T20:48:46+5:30
यश हे परिश्रम आणि इच्छाशक्तीवर अवलंबून असतं असं म्हणतात. तुम्हाला कोणत्या सुविधा मिळताहेत याला फार महत्व नसतं. हरियाणातील एका छोट्याशा गावातील अवघ्या १२ वर्षीय शेतकऱ्याचं लेकानं ते खरं करुन दाखवलं आहे.
यश हे परिश्रम आणि इच्छाशक्तीवर अवलंबून असतं असं म्हणतात. तुम्हाला कोणत्या सुविधा मिळताहेत याला फार महत्व नसतं. हरियाणातील एका छोट्याशा गावातील अवघ्या १२ वर्षीय शेतकऱ्याचं लेकानं ते खरं करुन दाखवलं आहे. अवघ्या १२ वर्षांचा कार्तिक जाखड आज अमेरिकेतील प्रतिष्ठीत हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहे. कार्तिकनं तुटलेल्या फोनमध्ये कोडिंग शिकून स्वत:ची योग्यता सिद्ध करुन दाखवली आणि जगाला दखल घेण्यास भाग पाडलं. कार्तिकचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं आहे.
दिल्लीपासून १०० किमी दूरवर असलेल्या हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यात झासवा गावातील १२ वर्षीय कार्तिक जाखडनं स्वत: तीन मोबाइल अॅप्स तयार केले आहेत. याच कारनाम्यासाठी त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे अॅप तयार करण्यासाठी त्यानं कोणतंही शिक्षण घेतलेलं नाही. फक्त मोबाइलवर ऑनलाइन शिक्षणाचे व्हिडिओ पाहून त्यानं अॅप्स तयार करण्याचं शिक्षण घेतलं. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या कार्तिकनं ज्या फोनच्या माध्यमातून हे शिक्षण घेतलं त्या फोनची स्क्रिन देखील तुटलेली होती.
वडील शेतात राबतात
कार्तिकचे वडील अजित सिंह शेतकरी असून ते दिवसभर त्याच कामात असतात. कार्तिकला तीन बहिणी आहेत. कार्तिकच्या घरात शिकण्यासाठी ना टेबल आहे ना खुर्ची. तसंच गावात २४ तास वीजेचीही सुविधा नाही.
ऑनलाइन व्हिडिओ पाहून कोडिंग शिकला
इयत्ता तिसरीला असल्यापासूनच काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती असं कार्तिक सांगतो. कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन क्लाससाठी वडिलांनी कार्तिकला १० हजार रुपये खर्चून एक अँड्रॉईड स्मार्टफोन घेऊन दिला. शाळेचा अभ्यास झाला की कार्तिक यूट्युबवर जाऊन कोडिंग आणि अॅप डेव्हलपिंगचे व्हिडिओ पाहायचा. युट्यूबवरचे व्हिडिओ पाहूनच त्यानं घरीच सेल्फ ट्रेनिंग सुरू केलं आणि हळूहळू स्वत:च मोबाइल अॅप्स तयार केले.
कार्तिकनं बनवलेले तीन अॅप्स कोणते?
कार्तिकनं बनवलेला पहिला मोबाइल अॅप जनरल नॉलेज संदर्भात आहे. या अॅपला त्यानं लूसेंट जीके ऑनलाइन असं नाव दिलं आहे. तर दुसऱ्या अॅपचं नाव श्री राम कार्तिक लर्निंग सेंटर असं आहे. यात कोडिंग आणि ग्राफिक्स डिझाइनिंगचं शिक्षण दिलं जातं. तिसरं अॅप हे डिजिटल एज्युकेशन संदर्भात आहे. याचं नाव श्री राम कार्तिक डिजिटल एज्युकेशन असं आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून कार्तिक एका संस्थेशी निकडीत जवळपास ४५ हजार गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे.
वयाच्या १२ व्या वर्षीच कार्तिकला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यात चाइल्ड प्रॉडिजी अवॉर्ड, ओमएजी बुक ऑफ रेकॉर्ड्सचा समावेश आहे. कार्तिकनं हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होऊन स्कॉलरशिप प्राप्त केली आहे. हार्वर्डमधून कार्तिक बीएससी इन कॉम्प्युटर सायन्सची डिग्री घेत आहे.