Karunanidhi Death Update :करुणानिधी कालवश, संपूर्ण तामिळनाडूवर पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 06:25 AM2018-08-08T06:25:47+5:302018-08-08T06:26:40+5:30

तमिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले एम. करुणानिधी यांचे येथील कावेरी रुग्णालयात मंगळवारी वृद्धापकाळातील आजारांमुळे निधन झाले.

Karunanidhi Death Update: Karunanidhi cholera, spread throughout Tamil Nadu | Karunanidhi Death Update :करुणानिधी कालवश, संपूर्ण तामिळनाडूवर पसरली शोककळा

Karunanidhi Death Update :करुणानिधी कालवश, संपूर्ण तामिळनाडूवर पसरली शोककळा

Next

चेन्नई : ७५ वर्षे तमिळ जनतेच्या मनावर राज्य करणारे द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते व ५ वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले एम. करुणानिधी यांचे येथील कावेरी रुग्णालयात मंगळवारी वृद्धापकाळातील आजारांमुळे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. तामिळनाडूमध्ये द्रविडी चळवळ रुजविण्यात व हिंदी भाषाविरोधी आंदोलन उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
तमिळी जनता त्यांना प्रेमाने कलैंगार (कलावंत) नावाने पुकारत असे. त्यांच्या निधनाने संपूर्ण तमिळनाडूवर शोककळा पसरली. तामिळनाडू सरकारने बुधवारी सार्वजनिक सुट्टी व सात दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. केंद्र सरकारनेही दुखवटा जाहीर केला आहे. चेन्नईतील त्यांचे निवासस्थान व रुग्णालयापाशी हजारो समर्थकांनी गर्दी केली होती. निधनाचे वृत्त येताच, राज्यातील सर्व शहरांत उत्स्फूर्त बंद सुरू झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुणानिधी यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. मोदी आणि राहुल गांधी यांच्यासह देशभरातील अनेक बडे नेते बुधवारी चेन्नईला जाऊन दिवंगत नेत्याचे अंत्यदर्शन घेणार आहेत. त्यांनी अनेक तमिळ चित्रपटांच्या कथा व पटकथा लिहिल्या आणि ते सारे चित्रपट गाजले. त्यांची तामिळ पत्रकारिताही गाजली. उत्तम प्रशासक असलेल्या करुणानिधी यांनी राज्यात गरीब व सामान्य लोकांना उपयोगी ठरतील, अशा अनेक योजना राबविल्या. पेरियार रामस्वामी नायकार यांनी उभी केलेली द्रविडी चळवळ पुढे नेण्याचे काम त्यांनी केले.
ते मुख्यमंत्री असतानाच राजीव गांधी यांची पेरंबदूरमध्ये लिबरेशन टायगर्स आॅफ तामिळ इलमच्या लोकांनी हत्या केली होती. त्यानंतर त्यांचे सरकार बरखास्त करण्यात आले होते. राजीव गांधी हत्याप्रकरणी त्यांनाही अनेक आरोपांना सामोरे जावे लागले. याचे कारणच मुळी तामिळ वाघ व करुणानिधी यांचे जवळचे संबंध होते. श्रीलंकेत स्वतंत्र तामिळ राष्ट्र व्हावे, अशी त्यांचीही इच्छा होती. त्यामुळे त्यांनी तामिळ इलमच्या नेत्या व कार्यकर्त्यांना सक्रिय पाठिंबा दिला होता. तामिळ चित्रपटसृष्टी व राजकारण यांचे अतुट नाते आहे. करुणानिधीही त्याला अपवाद नव्हते. किंबहुना विद्यार्थी दशेत असताना राजकारणात उडी घेणाऱ्या यांनी आधी पत्रकारिता व नंतर चित्रपट पटकथा लिहिल्या. एम. जी. रामचंद्रन यांच्याप्रमाणेच शिवाजी गणेशन हे त्यांच्या चित्रपटांचे नायक होते.
मरिनावर स्मारक नाही
करुणानिधी यांचे चिरंजीव व द्रमुकचे कार्यवाहक अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री एडापद्दी पलानीस्वामी यांची भेट घेऊन करुणानिधी यांच्या स्मारकासाठी चेन्नई शहरातील मरिना समुद्रकिनाºयावर अण्णादुराई यांच्या समाधीशेजारी जागा देण्याची विनंती केली. मात्र सरकारने ती अमान्य करून त्याऐवजी शहराच्या गुंडी भागात गांधी मडपमजवळ दोन एकर जागा देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे स्टॅलिन यांनी हायकोर्टात धाव घेतली. करुणानिधी यांच्या दफनविधीसाठी मरिना बीचवर जागा मिळावी, यासाठी डीएमकेने केलेल्या मागणीवर तातडीने सुनावणी घेण्याचे मद्रास हायकोर्टाने ठरवले असून कोर्टाचे कामकाज रात्रीच सुरू झाले होते.
सरकारच्या निर्णयामुळे डीएमके समर्थक आक्रमक झाले असून ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. कावेरी रुग्णालयाबाहेर हिंसक झालेल्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. गोपाळपुरम भागातही कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणा देत निदर्शने सुरू केली आहेत.
>२१ चाहत्यांच्या आत्महत्या
१० दिवसांपूर्वी करुणानिधी यांना इस्पितळात दाखल केल्यापासून दु:ख अनावर झालेल्या द्रमुकच्या २१ कार्यकर्त्यांनी तमिळनाडूच्या विविध भागांत आत्महत्या केल्या.

Web Title: Karunanidhi Death Update: Karunanidhi cholera, spread throughout Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.