2014 मधील मुझफ्फरनगर प्रमाणे 2019 च्या तयारीसाठी कासगंज हिंसा, गुजरातच्या माजी आयपीएस अधिका-याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 04:26 PM2018-01-29T16:26:37+5:302018-01-29T16:28:14+5:30
गुजरातमधील निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनी कासगंज हिंसेमागे राजकीय षडयंत्र असल्याचा इशारा दिला आहे
लखनऊ - उत्तर प्रदेशमधील कासगंज येथे प्रजासत्ताक दिनी भडकलेल्या हिंसेनंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षांसोबत अनेक संघटना आणि माजी अधिकारीदेखील आरोप-प्रत्यारोप करु लागले आहेत. गुजरातमधील निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनी कासगंज हिंसेमागे राजकीय षडयंत्र असल्याचा इशारा दिला आहे. संजीव भट्ट यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडलं आहे. त्यांच्या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. संजीव भट्ट यांनी 28 जानेवारीला हे ट्विट केलं. त्यांनी ट्विटरमध्ये लिहिलं की, 'कासगंज तर सुरुवात आहे. हा लो ग्रेड जातीय आजार 2019 लोकसभा निवडणुकीपर्यंत सुरु राहणार आहे. त्याचप्रमाणे जसा 2014 मध्ये मुझफ्फरनगर कांड झाला होता'. या ट्विटनंतर अनेकजण संजीव भट्ट यांना ट्रोल करत आहेत. काही लोकांनी संजीव भट्ट यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप केला आहे. तर काहींनी तुम्ही सत्यपरिस्थिती कथन करत असल्याचं म्हटलं आहे.
#Kasganj is just the beginning. The low-grade communal fever will continue to persist and spread till the Lok Sabha Elections of 2019. Kasganj will be to 2019 what Muzaffarnagar was to 2014. Only this time, the reach will be much wider and the ramifications much deeper. . .
— Sanjiv Bhatt (IPS) (@sanjivbhatt) January 28, 2018
नेमकं प्रकरण काय ?
शुक्रवारी कासगंज शहरात एका समाजाकडून तिरंगा यात्रा काढण्यात आली होती. तिरंगा यात्रा बड्डूनगर इथे पोहोचल्यानंतर दुसऱ्या समाजाच्या एका गटासोबत त्यांचा वाद झाला. दरम्यान, बंदुकीतून गोळी झाडण्यात आली. यामध्ये यात्रा काढलेल्या समाजाचा तरुण चंदन गुप्ता याचा गोळी लागून मृत्यू झाला. तर इतर दोन जण जखमी झाले. या घटनेनंतर हिंदूत्ववादी संघटनांनी शहरातील बाजारपेठा बंद पाडल्या. लोकांनी रस्त्यावर उतरुन घटनेचा निषेध करत दगडफेक केली.
शुक्रवारी अभिषेक ऊर्फ चंदन गुप्ता या 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारादरम्यान वाद निर्माण झाला होता. चितेला अग्नी दिल्यानंतरही लोकांनी त्याच्या अंत्यसंस्काराला विरोध केला होता. दरम्यान, खासदार राजवीर सिंह यांनी संबंधीत समाजाच्या नेत्यांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणे करुन दिल्यानंतर या तरुणावर अत्यंसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर परतताना जमावाने परिसरातील दुकानं पेटवायला सुरुवात केली. रस्त्यातील भाज्यांच्या गाड्याही त्यांनी पलटी केल्या. दुकानांची तोडफोड केली तसंच दोन बसही पेटविल्या. चार दिवसांपासून कासगंजमध्य तणावपूर्ण शांतता आहे.
कायदा - सुव्यवस्था राहावी यासाठी पोलिसांनी आतापर्यंत 112 जणांना अटक केली आहे. सात जणांविरोधात नावासहित गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओ फुटेजच्या आधारे हिसेंत सामील लोकांना अटक केली जात आहे. मुख्य आरोपी शकील फरार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्या घरी पिस्तूल आणि बॉम्ब सापडल्याचंही कळत आहे.