काशीपीठ देणार अनाथ मुलांना दर्जेदार शिक्षण, श्रीकाशी जगद् गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी देणार आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 06:28 AM2021-05-25T06:28:47+5:302021-05-25T06:29:16+5:30
Education News: तीन राज्यांमध्ये अनाथ मुलांना काशीपीठाकडून उत्तम दर्जाचे शिक्षण, महाप्रसाद आणि राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
वाराणसी : तीन राज्यांमध्ये अनाथ मुलांना काशीपीठाकडून उत्तम दर्जाचे शिक्षण, महाप्रसाद आणि राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आई, वडिलांच्या मृत्यूमुळे अनेक मुले अनाथ झाली आहेत. या मुलांना कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्रामध्ये काशीपीठाकडून दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था होणार आहे, असे काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले.
कर्नाटक राज्यातील बिसनळ्ळी (ता. शिग्गाव, जि. हावेरी) आणि गदगनगर येथे काशीपीठाचे पारंपरिक गुरुकुल आहे.
येथे वेद, संस्कृत, योग, संगीताबरोबरच आधुनिक शिक्षणसुद्धा दिले जाते. तसेच महाराष्ट्रातील लातूर, तेलंगणामध्ये शादनगर या ठिकाणीसुद्धा काशीपीठाचे पारंपरिक गुरुकुल आहे.
पालकांनी गुरुकुलच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन काशी जगद्गुरू महास्वामीजी यांनी केले आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे कोविड सेंटरची स्थापना केली असून, यामध्ये ३०० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.