काश्मीरमध्ये पाच वर्षांत ९६३ दहशतवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 04:56 AM2019-07-17T04:56:39+5:302019-07-17T04:56:48+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या पाच वर्षांत चकमकीत ९६३ दहशतवादी ठार, तर ४१३ सुरक्षा जवान शहीद झाले अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी लोकसभेमध्ये मंगळवारी दिली.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या पाच वर्षांत चकमकीत ९६३ दहशतवादी ठार, तर ४१३ सुरक्षा जवान शहीद झाले अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी लोकसभेमध्ये मंगळवारी दिली.
२०१४च्या सुरुवातीपासून ते जून २०१९पर्यंतची ही आकडेवारी आहे. जी. किशन रेड्डी यांनी सांगितले की, दहशतवाद कदापिही खपवून घेतला जाणार नाही हे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यादृष्टीने दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सुरक्षा दलांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. सीमेपलीकडून भारतात विशेषत: जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचे प्रयत्न होत असतात.
ते म्हणाले की, घुसखोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने बहुस्तरीय धोरणाची अंमलबजावणी केली आहे. आंतरराष्ट्रीय सीमा तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या प्रदेशांमध्ये विकासाची कामे हाती घेणे, कुंपण उभारणे, सुरक्षा जवानांना अत्याधुनिक शस्त्रे देणे, गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करणे असे अनेक उपाय योजण्यात आले असून त्याचे योग्य परिणामही दिसत आहेत.
> ४०० दहशतवाद्यांची घुसखोरी
गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन वर्षांत सुमारे ४०० दहशतवाद्यांनी घुसखोरी केली. त्यातील १२६ दहशतवादी सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत ठार झाले. या काळात २७ सुरक्षा जवान शहीद झाले तर चार दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आले.
काश्मीरमध्ये २०१८च्या तुलनेत यंदाच्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत घुसखोरीचे प्रमाण ४३ टक्के कमी करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. २०१८ साली दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या १४३ घटना घडल्या होत्या. २०१६ साली हेच प्रमाण ११९ व २०१७ साली १३६ इतके होते.