काश्मीरमध्ये पुन्हा पाक, इसिसचे झेंडे
By admin | Published: October 4, 2015 02:52 AM2015-10-04T02:52:56+5:302015-10-04T02:52:56+5:30
जम्मू-काश्मिरात श्रीनगरच्या जामिया मशीद आणि आजूबाजूच्या भागात शुक्रवारी पुन्हा एकदा इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सिरिया अर्थात इसिस ही अतिरेकी संघटना
श्रीनगर : जम्मू-काश्मिरात श्रीनगरच्या जामिया मशीद आणि आजूबाजूच्या भागात शुक्रवारी पुन्हा एकदा इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सिरिया अर्थात इसिस ही अतिरेकी संघटना आणि पाकिस्तानचे झेंडे फडकले. यादरम्यान हे झेंडे फडकवणारे युवक आणि पोलिसांत जोरदार संघर्ष उडाला.
जामिया मशिदीत शुक्रवारची नमाज अदा केली गेल्यानंतर लगेच चेहरा झाकलेल्या युवकांचा एक गट रस्त्यावर उतरला; आणि त्याने पाकिस्तान, इसिस तसेच जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनांचे झेंडे फडकवणे सुरू केले. याश्विाय जमाद-उद-दवाचा प्रमुख हाफिज सय्यद आणि हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सल्लाहुद्दीन यांचे पोस्टर्सही झळकवले. या युवकांच्या हातात उत्तर काश्मीरच्या सोपोरमधील हिंसाचारात ठार झालेला ३ वर्षांचा चिमुकला बरहान आणि सिरियाच्या समुद्रकिनाऱ्यावर ज्याचा मृतदेह आढळला त्या अलयानचे पोस्टर्सही होते. तीन वर्षांचा बरहान आणि त्याचे वडील गत २० सप्टेंबरला सोपोरमध्ये अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात ठार झाले होते; तर निर्वासितांच्या लोंढ्यातील आपल्या कुटुंबासमवेत निघालेला चिमुकला अलयान याचा गत २ सप्टेंबरला समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. युवकांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ नारेबाजी व दहशतवादी संघटनांचे झेंडे फडकवणे सुरू करताच, पोलिसांनी मोर्चा सांभाळला. याचदरम्यान या युवकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. या वेळी पोलीस आणि या युवकांमध्ये जोरदार संघर्ष उडाला. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी डझनभर अश्रुधुराची नळकांडी फोडली.