काश्मिरात पुन्हा संघर्ष, युवक ठार
By Admin | Published: July 23, 2016 05:29 AM2016-07-23T05:29:24+5:302016-07-23T05:29:24+5:30
काश्मीरमध्ये शुक्रवारच्या नमाजनंतर निदर्शक आणि सुरक्षा दलांत उडालेल्या चकमकीत एका युवकाचा मृत्यू झाला.
श्रीनगर : काश्मीरमध्ये शुक्रवारच्या नमाजनंतर निदर्शक आणि सुरक्षा दलांत उडालेल्या चकमकीत एका युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे खोऱ्यात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारातील बळींची संख्या वाढून ४५ झाली आहे. दरम्यान, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह शनिवारी श्रीनगरला येत आहेत.
परिस्थिती शांत असली तरी संचारबंदी लागू असलेल्या खोऱ्यात विशेष करून बारामुला, कुपवाडा आणि पुलवामा जिल्ह्यात अनेक ठिकाणी दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. कायदा व सुव्यवस्था आणखी बिघडण्याच्या भीतीमुळे खोऱ्यातील दहा जिल्ह्यांत संचारबंदी लागू आहे.
शुक्रवारच्या नमाजनंतर पुलवामाच्या अवंतीपोरा भागातील चुरसू येथील निदर्शनादरम्यान मुश्ताक अहमद भट्ट हा युवक पेलेट गनचा छर्रा लागून गंभीर जखमी झाला. त्याला एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, त्याचा मृत्यू झाला. एसएमएचएस रुग्णालयात आज आणखी दोन जखमींना दाखल करण्यात आले. यातील एक जण पुलवामाच्या काकापुरा येथे आणि दुसरा बाराबुला येथील सोपोर भागात जखमी झाला. काकापुरा येथील संघर्षात जखमी झालेल्या आसीफची प्रकृती गंभीर आहे. दुसरीकडे अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागातील संघर्षात जखमी झालेल्या इश्तियाक अहमद याचा सुरा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या ८ जुलै रोजी हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वनी याचा चकमकीत मृत्यू झाल्यापासून खोऱ्यात सुरक्षा दले आणि निदर्शकांत चकमकी सुरू आहेत. (वृत्तसंस्था)
>केंद्र स्तरावरून पहिल्यांदाच उच्चस्तरीय दौरा
जम्मू-काश्मीरचे पीडीपी-भाजप सरकार परिस्थिती काबूत आणण्यासाठी संघर्ष करीत आहे. खोऱ्यात पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राजनाथसिंह दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर येणार असून, श्रीनगरमध्ये ते लोकांशी चर्चा करतील. गेल्या ८ जुलै रोजी हिंसाचार उफाळल्यापासून केंद्र स्तरावरून पहिल्यांदाच उच्चस्तरीय दौरा होत आहे.