काश्मीरमधील व्यवहार विस्कळीतच
By admin | Published: July 15, 2016 02:34 AM2016-07-15T02:34:31+5:302016-07-15T02:34:31+5:30
संचारबंदीसारखे निर्बंध आणि फुटीरवाद्यांनी दिलेल्या बंदच्या हाकेमुळे काश्मीर खोऱ्यातील दैनंदिन जीवन गुरुवारी सलग सहाव्या दिवशीही विस्कळीत होते
श्रीनगर : संचारबंदीसारखे निर्बंध आणि फुटीरवाद्यांनी दिलेल्या बंदच्या हाकेमुळे काश्मीर खोऱ्यातील दैनंदिन जीवन गुरुवारी सलग सहाव्या दिवशीही विस्कळीत होते. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनी याचा ८ जुलै रोजी पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर खोऱ्यात उसळलेल्या हिंसाचारात ठार झालेल्यांची संख्या ३६ वर गेली आहे.
श्रीनगरचा काही भाग, उत्तर काश्मीर आणि दक्षिण काश्मीरच्या चार जिल्ह्यांमध्ये ९ जुलैपासून नागरिकांच्या हालचालींवर
कायदा आणि सुव्यवस्थेसाठी घातलेली बंधने अजूनही कायम आहेत. त्यामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून, भाजीपाला व किराणा मालासाठीही घराबाहेर पडणे लोकांना अशक्य झाले आहे.
सार्वजनिक वाहतूक सलग सहाव्या दिवशी बंद आहे. दुकाने, खासगी कार्यालये, पेट्रोलपंप बंद असून, सरकारी कार्यालयांत उपस्थिती तुरळक आहे. बँकांचे व्यवहारही बंद असून, एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाणेही अवघड झाले आहे.
त्यामुळे लोकांमध्ये अधिक राग आहे. वनीच्या मृत्यूनंतर फुटीरवाद्यांनी चार वेळा संपाची हाक दिली आहे. दुकाने, आस्थापना आता शुक्रवारपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन फुटीरवाद्यांनी केले आहे. ८ जुलैपासून लोकांना त्यांनी संप पाळण्यास सांगितले होते.
दरम्यान, पोलीस आणि सशस्त्र दलाच्या जवानांनी केलेल्या छर्ऱ्याच्या माऱ्यात डोळ्यांना इजा झालेल्यांची संख्या १00हून अधिक झाली आहे. वेळेत उपचार न झाल्यास त्यांना अंधत्व येण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे ज्यांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे, त्यांना दिल्लीत उपचारासाठी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (वृत्तसंस्था)
खोळंबा
संप आणि निर्बंधांमुळे मोठ्या संख्येने लोकांनी विवाह समारंभ पुढे ढकलले आहेत. अनेक कुटुंबे विवाह समारंभ पारंपरिक थाटमाट टाळून व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अतिशय साध्या पद्धतीने करीत आहेत. खोऱ्यातील वृत्तपत्रांमध्ये विवाह समारंभ रद्द झाल्याच्या छोट्या जाहिराती रोजच्या रोज प्रसिद्ध होत आहेत.