काश्मीर धुमसतेच, मृतांची संख्या २१ : मोबाइल आणि इंटरनेट सेवा ठप्प
By admin | Published: July 11, 2016 04:23 AM2016-07-11T04:23:51+5:302016-07-11T04:23:51+5:30
रविवारी या हिंसाचारात एका पोलिसासह अन्य सहा नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. मृतांचा हा आकडा २१वर पोहोचला आहे. तर या हिंसाचारात आतापर्यंत २०० जण जखमी झाले आहेत
श्रीनगर : काश्मीरमध्ये अतिरेकी बुऱ्हान वनी मारला गेल्यानंतर उसळलेला हिंसाचार अद्याप सुरूच आहे. रविवारी या हिंसाचारात एका पोलिसासह अन्य सहा नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. मृतांचा हा आकडा २१वर पोहोचला आहे. तर या हिंसाचारात आतापर्यंत २०० जण जखमी झाले आहेत. काश्मीर खोऱ्यात संचारबंदीसदृश स्थिती आहे. तर मोबाइल आणि इंटरनेट सेवा ठप्प आहे.
हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान वनीला मारल्यानंतर सतत दुसऱ्या दिवशी हिंसाचार सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेतला. तर मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी चर्चा करून सर्वोपरी मदतीचे आश्वासन दिले. काश्मीरमध्ये अनेक भागातून हिंसाचाराचे वृत्त
आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पुलवामा शहरात नेवा येथे आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात संघर्ष झाला. यात १८ वर्षांचा इरफान अहमद मलिक हा तरुण गंभीर जखमी झाला. येथे एका हॉस्पिटलमध्ये त्याला उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
एका अज्ञात व्यक्तीला गंभीर अवस्थेत येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा येथे मृत्यू झाला. या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यात एका वाहनाला झेलम नदीत ढकलून देण्यात आले. यात पोलीस चालक फिरोज अहमद यांचा मृत्यू झाला.
पुलवामा जिल्ह्यात एका हेड कॉन्स्टेबलला गोळ्या घालण्यात आल्या. तर दमहाल हांजीपुरातील एका ठाण्यावर जमावाने हल्ला केल्यानंतर येथील तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. अनंतनाग जिल्ह्यात अचबल भागात एका पोलीस चौकीवर जमावाने हल्ला केला. या वेळी सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात तीन तरुण जखमी झाले आहेत.
आणखी एक तरुण श्रीनगर - जम्मू राष्ट्रीय महामार्गावर गोळी लागून जखमी झाला आहे. तर शनिवारी रात्री हिंसाचारात जखमी झालेल्या चार जणांचा मृृत्यू झाला.
जमावाने तीन सरकारी कार्यालये, पीडीपीच्या एका आमदाराच्या घराला आणि काही वाहनांना आग लावली. भाजपाच्या एका कार्यालयालाही जमावाने लक्ष्य केले. सय्यद अली शाह गिलानी, मीरवैज उमर फारुक यांच्यासह फुटीरवादी नेते अद्यापही नजरकैदेत आहेत. मोहम्मद यासीन मलिकला सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेतले आहे. (वृत्तसंस्था)
हिजबुल मुजाहिदीनच्या वरिष्ठ कमांडरला ठार मारून भारताने काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप रविवारी पाकिस्तानने केला. काश्मीर प्रश्न केवळ तेथील नागरिकांना स्वयंनिर्णयाचा हक्क असल्याचे मान्य केले तरच सोडवला जाणे शक्य आहे, असेही पाकने म्हटले. निष्पाप काश्मिरी नागरिकांच्या सततच्या हत्यांचा पाक कठोरपणे निषेध करतो.
काश्मिरी नेते बुऱ्हान वाणी व असंख्य निष्पाप काश्मिरींची हत्या ही खेदजनक व निषेधार्थ असून, त्यामुळे काश्मिरींच्या मूलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन होते. हत्यांमुळे जम्मू आणि काश्मिरींच्या स्वयंनिर्णयाला रोखता येणार नाही, असे त्यात म्हटले.
गृहमंत्र्यांची मेहबूबांशी चर्चा
नवी दिल्ली : गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सरकारकडून आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले, काश्मीरमधील स्थितीबाबत अर्धा तास चर्चा झाली. मेहबूबा यांनी राजनाथसिंह यांना माहिती दिली. त्यानंतर राजनाथसिंह यांनी गृहखात्याच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
यात्रा स्थगित
जम्मू : काश्मीरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली आहे. जम्मूचे उपायुक्त सिमरनदीप सिंह यांनी सांगितले की, ही यात्रा रविवारीही बंद होती. जम्मूूहून आज नवा जथा पाठविण्यात आला नाही. तथापि, काश्मीरहून आधार शिबिरातून यात्रा सुरू आहे.