काश्मीर पेटलेले; सरकार मात्र शांत!
By admin | Published: August 8, 2016 04:32 AM2016-08-08T04:32:17+5:302016-08-08T04:32:17+5:30
हिजबुल मुजाहिद्दिनचा दहशतवादी बुरऱ्हान वनीच्या एन्काउंटरला महिना उलटून गेला तरी काश्मीर खोऱ्यातला तणाव कायम आहे
सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
हिजबुल मुजाहिद्दिनचा दहशतवादी बुरऱ्हान वनीच्या एन्काउंटरला महिना उलटून गेला तरी काश्मीर खोऱ्यातला तणाव कायम आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान मोदींना शनिवारी एक खुले पत्र पाठवले. काश्मिरी जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी विद्यमान केंद्र सरकार काहीही करीत नसून लवकरच काही ठोस उपाय योजले नाहीत तर तणाव दूर होणार नाही, अशी विनंती आझाद यांनी या पत्रात केली आहे.
काश्मीरमध्ये जनजीवन सामान्य करण्यासाठी लवकरात लवकर कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे, असे आग्रहाने नमूद करीत आझाद म्हणतात, बेरोजगार तरुणांना चिथावणी देऊन सामान्य जनतेला वेठीला धरण्याचे प्रयोग काश्मीरला नवीन नाहीत. आजपेक्षा खराब वातावरणातही माणुसकीचा धागा न तोडता लोकशाही मार्गाने स्थानिक जनतेची मने जिंकण्याचे प्रयत्न यापूर्वीच्या सरकारांनी कधी थांबवले नव्हते.
आपल्या खुल्या पत्रात आझाद म्हणतात, ‘पंतप्रधान असतांना वाजपेयींनी दिल्ली लाहोर बससेवा सुरू केली. त्याच धर्तीवर यूपीएच्या कारकिर्दीत मनमोहन सिंग यांनी उरी-मुझफ्फराबाद, पुंछ-रावळकोट मार्गावर बससेवा सुरू केल्या. काश्मीरमध्ये रेल्वेची मुहूर्तमेढही याच काळात रोवली गेली. या सकारात्मक पुढाकाराचा काश्मिरी जनतेवर चांगला परिणाम झाला होता. काश्मीर मुळात एक संवेदनशील राज्य आहे. केंद्र सरकारने कोणताही निर्णय एकतर्फी घेतला तर त्याचे तीव्र पडसाद या राज्यात उमटतात. ‘इन्सानियत’ व ‘काश्मिरीयत’चे भान ठेवून स्थानिक जनतेला विश्वासात घेतले गेले तर या राज्यात शांतता नांदते.
1आझाद यांच्या खुल्या पत्रानंतर भाजपचे राष्ट्रीय पदाधिकारी राम माधव इंडिया फौंडेशन आयोजित संमेलनात सहभागी होण्यासाठी पटनीटॉपला पोहोचले आहेत. संमेलनात रा.स्व.संघाचे महत्वाचे सदस्य सहभागी असून काश्मिरमधील फुटीर गटाच्या नेत्यांनाही या संवाद प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
2इंडिया फौंडेशन नामक एका स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या संमेलनात काश्मिरमधील ८0 बुध्दिजीवी व विविध वर्गातल्या मान्यवर सदस्यांसह रा.स्व. संघाच्या सदस्यांचा सहभाग आहे.