मसरत आलमच्या अटकेविरोधात काश्मीर बंद, एका निदर्शकाचा मृत्यू
By Admin | Published: April 18, 2015 10:30 AM2015-04-18T10:30:24+5:302015-04-18T19:00:13+5:30
फुटीरवादी नेता मसरत आलमच्या अटकेच्या निषेधार्थ शनिवारी काश्मीरमध्ये बंद पुकारण्यात आला असून नारबल येथे पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला आहे.
ऑऩलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 18 - फुटीरवादी नेता मसरत आलमच्या अटकेच्या निषेधार्थ शनिवारी काश्मीरमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. नारबल येथे फुटीरतावाद्यांनी काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवला असता निदर्शकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली, आंदोनकर्त्यांना थोपवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानचा झेंडा फडकावत भारतविरोधी घोषणाबाजी करणा-या मसरत आलमला अटक करून त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या निर्णयाच्या निषेधार्थ काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील नारबल येथे काही आंदोलनकर्त्यांनी निदर्शने केली. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला असता एक जण जखमी झाला, त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान शुक्रवारी मसरत आलमच्या अटकेनंतर श्रीनगरमध्ये हुरियत कॉन्फरन्सच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने केली होती. आंदोलनाचे केंद्र असलेल्या त्राल परिसर आणि श्रीनगरमध्ये निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी अश्रू धुराचा मारा केला. यात डझनावर लोक आणि दोन पोलीस जखमी झाले.